भारताच्या गौरव बिधुरीने जागतिक बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत भारतासाठी एक पदक निश्चीत केलं आहे. जागतिक स्पर्धेत अशी कामगिरी करणारा गौरव चौथा भारतीय बॉक्सर ठरला आहे. ५६ किलो वजनी गटात गौरवने ट्युनिशीयाच्या बिलेल महमदीचा पराभव केला. जर्मनीच्या हॅमबर्ग शहरात सध्या जागतिक बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धा सुरु आहे. या स्पर्धेत गौरवचा पुढील सामना अमेरिकेच्या ड्युक रेगनशी ३१ ऑगस्टला होणार आहे. बिलेलवर मिळवलेल्या विजयामुळे गौरवचं कांस्यपदक निश्चीत मानलं जातंय.

गौरव बिधुरीच्या आधी विजेंदर सिंह, शिव थापा आणि विकास क्रिशन या ३ बॉक्सरना जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत पदक मिळवण्याचा कारनामा करता आलेला आहे. या यादीमध्ये गौरवने आपलं स्थान पक्क केलं आहे.

“माझ्यासाठी हे सर्व विश्वास ठेवण्यापलीकडचं आहे. गेले ७-८ महिने मी पाठदुखीने त्रस्त होतो. पण मला माझं ध्येय कोणत्याही परिस्थितीत गाठायचं होतं, त्यामुळे दुखापतीचा माझ्या खेळावर कोणताही परिणाम होऊ द्यायचा नाही हे मी आधीच ठरवलं होतं. त्यामुळे मी जे स्वप्न पाहिलेलं होतं, ते आता लवकरच पूर्ण होईल असं मला वाटतंय”. आपला सामना जिंकल्यानंतर गौरवने पत्रकारांशी बोलताना ही प्रतिक्रिया व्यक्त केली.

या कालावधीत माझ्या प्रशिक्षकांची मला खूप मदत झाली. प्रत्येक पातळीवर मला दुखापतीमुळे होणारा त्रास त्यांनी जवळून पाहिला आहे. माझ्या या विजयाचं श्रेय मला माझ्या वडिलांना द्यायला आवडेल. गौरव बिधुरीची ही पहिलीच जागतिक बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धा आहे. या स्पर्धेत गौरवला वाईल्ड कार्ड एन्ट्री मिळाली होती. त्यामुळे गौरवने केलेल्या कामगिरीचं सर्वच स्तरातून कौतुक केलं जातंय.