जागतिक बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश करणारा पहिला भारतीय खेळाडू असा इतिहास घडवणाऱ्या अमित पांघलला अंतिम फेरीत अखेरीस सुवर्णपदकाने हुलकावणी दिली आहे. ५२ किलो वजनी गटात उझबेगिस्तानच्या शाखोबिद्दीन झोईरोव्हने अमितवर मात करत विजेतेपद पटकावलं आहे. यामुळे अमितला रौप्यपदकावर समाधान मानावं लागणार आहे. अंतिम फेरीत पंचांनी एकमताने उझबेगिस्तानच्या खेळाडूला आपला कल दिला. जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत रौप्यपदकाची कमाई करणारा अमित पहिला भारतीय पुरुष बॉक्सर ठरला आहे.

याआधी भारताकडून विजेंदर सिंह, विकार क्रिशन, शिव थापा, गौरव बिधुरी या खेळाडूंनी जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत कांस्यपदकाची कमाई केली होती. भारताच्या मनिष कौशलनेही यंदाच्या स्पर्धेत कांस्यपदकाची कमाई केली आहे. जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतली भारताची ही आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी मानली जात आहे.