World Boxing Championship या स्पर्धेत भारताची महिला बॉक्सर सोनिया चहल हिने स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली आणि किमान रौप्यपदक निश्चित केले. उपांत्य फेरीत सोनियाने उत्तर कोरियाच्या जो सोन व्हा हिचा ५-० असा पराभव केला. ५७ किलो वजनी गटात भारताच्या सोनियाने सामन्यावर पूर्ण वर्चस्व राखले होते. तिने प्रतिस्पर्धी बॉक्सरला सामन्यात डोके वर काढण्याची संधींचंज दिली नाही. त्यामुळे तिला एकतर्फी विजय मिळवता आला. उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात सोनिया चहल हिने कोलंबियाच्या येनी कास्टनाडा हिच्यावर ४-१ असा विजय मिळवला होता आणि उपांत्य फेरीत धडक मारली होती.

अंतिम सामना अतिशय अटीतटीचा असेल, पण मी माझी सर्वोत्तम कामगिरी करण्याचा प्रयत्न करेन, अशा भावना तिने व्यक्त केल्या.

दरम्यान, हे भारतासाठी दुसरे किमान रौप्यपदक आहे. याआधी स्टार बॉक्सर मेरी कोम हिने काल अंतिम फेरी गाठली. तिने उपांत्य फेरीत उत्तर कोरियाच्या किम ह्यांग हिचा पराभव केला. तिने ह्यांग हिचा ४५ ते ४८ किलो वजनी गटात ५-० असा पराभव केला होता.

दरम्यान, भारताची सिमरनजीत कौर हिला मात्र ६४ किलो वजनी गटात चीनच्या ड्युओ डॅन हिने पराभूत केले. त्यामुळे सिमरनजीत कौरला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. तिला चीनच्या प्रतिस्पर्ध्याने ४-१ असे पराभूत केले. त्यामुळे भारताला अद्याप २ कांस्यपदके मिळाली आहेत.