World Boxing Championship या स्पर्धेत भारताची स्टार बॉक्सर मेरी कोम हिने पदक निश्चित करत उपांत्य फेरीत प्रवेश केल्यानंतर दुसऱ्या एका भारतीय महिला बॉक्सरनेदेखील उपांत्य फेरीत धडक मारली आहे. भारताच्या लोव्हलीना बोरगोहैन हिने उपांत्यपूर्व फेरीत ऑस्ट्रेलियाच्या के स्कॉट ५-० ने धुवा उडवत हा पराक्रम केला आहे. त्यामुळे भारताचे या स्पर्धेतील आता दुसरे पदक निश्चित झाले आहे. लोव्हलीना हिने ऑस्ट्रेलियाच्या के स्कॉट हिला ६९ किलो वजनी गटात धूळ चारली. तिने सामन्यात स्कॉटला चारी मुंड्या चीत केले आणि भारतासाठी आणखी एक पदक निश्चित केले.

या आधी आज मेरी कोम हिने स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली. उपांत्यपूर्व फेरीत तिने चीनच्या वू यु हिला ५-० असे पराभूत केले. मेरी कोमच्या या विजयामुळे तिचे जागतिक स्पर्धेमध्ये पहिले पदक निश्चित झाले होते. ४८ किलो वजनी गटात तिची झुंज चीनच्या वू यु हिच्याशी झाली. या सामन्यात मेरी कोमने सामन्यावर पूर्णपणे वर्चस्व राखले. चीनच्या प्रतिस्पर्ध्याला सामन्याच्या कोणत्याही क्षणाला तिने डोके वर काढू दिले नाही. तिच्या या सुंदर खेळीमुळे तिला या सामन्यात एकतर्फी विजय मिळवता आला होता.