ईकॅटरिनबर्ग : अमित पांघल (५२ किलो) आणि मनीष कौशिक (६३ किलो) यांनी जागतिक बॉक्सिंग स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे. आता शुक्रवारी होणाऱ्या लढतीत विजय मिळवत अंतिम फेरी गाठून ते नवा इतिहास घडवणार का, याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.

भारताला या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत आतापर्यंत एकदाही दोन पदके पटकावता आली नव्हती. उपांत्य फेरीत मजल मारून हरयाणाच्या या दोन खेळाडूंनी किमान कांस्यपदकाची निश्चिती केली आहे. जर या दोघांनी अंतिम फेरी गाठली तर भारतासाठी तो नवा इतिहास ठरणार आहे. दोघांसाठी हे आव्हान खडतर असणार आहे. पांघलला कझाकस्तानच्या साकेन बिबोस्सिनोव्ह याच्याशी दोन हात करावे लागणार आहेत. साकेनने अर्मेनियाच्या युरोपियन सुवर्णपदक विजेत्या तसेच सहाव्या मानांकित आर्टर होवानिस्यान याला धूळ चारली. आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणाऱ्या पांघलने अलीकडेच लागोपाठ दोन आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये सुवर्णपदके मिळवली आहेत.

कौशिकला क्युबाच्या अव्वल मानांकित अँडी गोमेझ क्रूझ याच्याशी दोन हात करावे लागणार आहेत. क्रूझने २०१७च्या जागतिक स्पर्धेत ६४ किलो गटात सुवर्णपदक तसेच पॅन अमेरिकन स्पर्धेत दोन वेळा विजेता होण्याचा मान पटकावला होता. आतापर्यंत जागतिक स्पर्धेत विजेंदर सिंग (२००९), विकास कृष्णन (२०११), शिवा थापा (२०१५) आणि गौरव बिदुरी (२०१७) यांनी भारताला पदके मिळवून दिली आहेत.

क्रूझच्या मागील लढतींचे व्हिडीओ मी पाहिले आहेत. तो चांगला बॉक्सर आहे, यात शंकाच नाही. पण त्याला हरवूच शकणार नाही, इतका चांगला खेळ तो करत नाही. या लढतीत माझ्यावर दडपण नक्कीच असेल.

– मनीष कौशिक