News Flash

कौटुंबिक वादामुळे पी.व्ही. सिंधू लंडनला निघून गेली ?

जीवनाच्या या टप्प्यावर तिला तिच्या पद्धतीने आयुष्य जगायचे आहे...

(संग्रहित छायाचित्र)

भारताची अव्वल महिला बॅडमिंटनपटू पी.व्ही.सिंधूने ऑलिम्पिक तयारीसाठी सुरु असलेलं राष्ट्रीय शिबिर अर्ध्यावर सोडलं आहे. सिंधू थेट लंडनमध्ये दाखल झाली आहे. शिबिर अर्ध्यावर सोडण्याच्या तिच्या निर्णयावर भारतीय बॅडमिंटन जगतात आश्चर्य व्यक्त होत आहे. तंदुरुस्ती आणि न्यूट्रीशिअनसाठी यूकेला गेल्याचं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर म्हटलं आहे. मागच्या दहा दिवसांपासून सिंधू यूकेमध्ये असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

ऑलिम्पिकमध्ये पदकाची अपेक्षा असलेल्या सिंधूने राष्ट्रीय शिबिर अर्ध्यावर सोडणं आश्चर्यकारण आहेच. पण सिंधू थेट परदेशात असताना, तिचे पालकही तिच्यासोबत नाहीयत. यूकेमध्ये तज्ज्ञांची समिती तिच्यावर लक्ष ठेवून असणार आहे. दोन महिने सिंधू यूकेमध्ये थांबेल, असा अंदाज आहे.

सिंधू लंडनला रवाना झाली, त्यावेळी ती चिडलेली होती. कौटुंबिक तणाव सुद्धा एक कारण आहे, असे टाइम्स ऑफ इंडियाने सूत्रांच्या हवाल्याने म्हटले आहे. हैदराबाद सोडण्यापूर्वी सिंधूने गोपीचंद अ‍ॅकेडमीतील प्रशिक्षकांना पुढचे आठ ते दहा आठवडे भारतात परतणार नसल्याचे सांगितले आहे.

सिंधूचे वडिल पी.व्ही.रामाना फोन उचलत नाहीयत तसेच मेसेजला प्रतिसाद देत नाहीयत. “काही गोष्टींमुळे सिंधू निराश आहे. समजूत घालून तिला परत आणण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत” असे सूत्रांनी सांगितले. “सिंधू लवकर भारतात परतण्याची शक्यता कमी आहे. जीवनाच्या या टप्प्यावर तिला तिच्या पद्धतीने आयुष्य जगायचे आहे. तिला स्वत:वर कोणाचे नियंत्रण नकोय. तिला थोडे स्वातंत्र्य हवे असेल. या ब्रेकमध्ये तिला आनंद मिळेल आणि ती परत येईल” अशी अपेक्षा सूत्रांनी व्यक्त केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 20, 2020 11:13 am

Web Title: world champ pv sindhu quits olympic camp over personal issue dmp 82
Next Stories
1 ट्वेन्टी-२० विश्वचषकासाठी भारताने व्हिसाची खात्री द्यावी!
2 परभणीच्या पिंपळ गावात गुरू-शिष्यांची जैव-सुरक्षित वातावरण निर्मिती
3 भारताच्या महिलाही उपांत्यपूर्व फेरीत
Just Now!
X