सध्या करोनामुळे जगभरात टाळेबंदी असताना विश्वचषक विजेत्या हॉकी संघातील माजी खेळाडू अशोक दिवाण हे अमेरिकेत अडकले आहेत. त्यांची प्रकृती खालावली असून भारतात परतण्यासाठी तातडीने व्यवस्था करावी, अशी विनंती त्यांनी क्रीडा मंत्रालयाला केली आहे.

दिवाण हे भारताने १९७५मध्ये जिंकलेल्या विश्वचषक हॉकी संघातील माजी खेळाडू आहेत. दिवाण यांनी सर्वात प्रथम भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे (आयओए) अध्यक्ष नरिंदर बात्रा यांच्याशी संपर्क साधला. ‘‘मी अमेरिकेत अडकलो असून माझी तब्येत बिघडली आहे. कॅलिफोर्निया येथे गेल्या आठवडय़ात मला तातडीने उपचार घ्यावे लागले. माझ्याकडे येथे वैद्यकीय विमा नाही. या स्थितीत अमेरिकेत उपचार घेणे परवडणारे नाही. नियोजित कार्यक्रमानुसार २० एप्रिलला एअर इंडियाच्या विमानाने मी भारतात परतणार होतो. मात्र टाळेबंदीमुळे मी भारतात परतू शकलो नाही. मला अमेरिकेतील रुग्णालयात उपचार घेण्यासाठी आर्थिक मदत करावी किंवा सॅन फ्रान्सिस्कोहून भारतात परतण्यासाठी मार्ग उपलब्ध करून द्यावा,’’ अशी विनंती दिवाण यांनी बात्रा यांना केली. लवकरात लवकर मार्ग काढावा कारण प्रकृती खालावत आहे, असेही दिवाण यांनी म्हटले आहे.

ध्यानचंद पुरस्कार विजेते ६५ वर्षीय दिवाण यांनी १९७६च्या ऑलिम्पिकमध्येही भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. दिवाण यांचे पत्र केंद्रीय क्रीडामंत्री किरेन रिजिजू यांनी परराष्ट्र मंत्रालयाला पाठवून याप्रकरणी त्वरित निर्णय द्यावा अशी विनंती केली आहे.

‘‘माझे वडील डिसेंबरमध्ये माझ्या भावाला भेटायला अमेरिकेत गेले. मात्र माझ्या वडिलांची अमेरिकेत तब्येत बिघडली. उच्च रक्तदाबाचा त्यांना त्रास होऊ लागला. तेथे ज्या वैद्यकीय चाचण्या त्यांच्या झाल्या, त्यातून हृदयाचा त्रास त्यांना असल्याचे दिसून आले आहे,’’ असे दिवाण यांची मुलगी आरुषी यांनी सांगितले.