आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक खेळाडूंनी नेत्रदीपक प्रगती केली असल्यामुळे जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत पदक मिळविणे ही काही सोपी गोष्ट राहिलेली नाही. त्यामुळेच रौप्यपदकाबाबतही मला समाधान आहे, असे जागतिक रौप्यपदक विजेत्या पी. व्ही. सिंधू हिने सांगितले.

ग्लासगो येथे नुकत्याच झालेल्या जागतिक स्पर्धेतील अंतिम फेरीत सिंधू हिला नोझोमी ओकुहारा या जपानच्या खेळाडूने हरविले होते. या सामन्यात सिंधू हिला पहिली गेम घेण्याची संधी साधता आली नव्हती. या सामन्यात या दोन खेळाडूंमध्ये एका गुणाच्या वेळी ७३ फटक्यांची रॅली झाली होती. हा सामना एक तास ५० मिनिटे चालला होता.

सिंधू हिने सांगितले, बॅडमिंटनमधील कोणत्याही गटाच्या सामन्यांमध्ये खूप वेळ रॅली सुरू असतात. कोणालाही सहजासहजी विजय मिळविता येत नाही. प्रत्येक गुणाकरिता झगडावे लागते. शारीरिक व मानसिक तंदुरुस्तीची तेथे कसोटीच पाहावयास मिळते. अर्थात, जागतिक स्तरावर खेळताना तेथे सर्वोच्च कौशल्य दाखवावे लागते. माझ्याप्रमाणेच ओकुहारा हीदेखील थकली होती. मात्र तिने शेवटच्या गेममध्ये अतिरिक्त ऊर्जा दाखवीत विजय मिळविला. या गेममध्ये २०-२० अशी बरोबरी असताना सामन्यात कोण विजय मिळविल हे सांगता येत नव्हते. तो दिवस माझा नव्हता एवढेच मी सांगू शकेन. सामना संपल्यानंतर मी थोडी निराश झाले. अर्थात, मी पुन्हा मनाचा धीर केला व आपल्याला अजून भरपूर करीअर करायचे आहे अशी मी मनाशी खूणगाठ बांधली. कांस्यपदकाऐवजी रौप्यपदक मिळविले हीदेखील खूप चांगली कामगिरी आहे असे मी आता मानत आहे.

अंतिम फेरीत स्थान मिळविताना मी चीनच्या सून यू व चेन युफेई यांच्यावर मात केली याचाही मला रास्त अभिमान वाटत आहे. एकेकाळी बॅडमिंटनमध्ये चीनची मक्तेदारी होती. ही मक्तेदारी मोडल्याबद्दल मला खूप समाधान वाटत आहे. माझ्या रौप्यपदकाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेकांनी सामाजिक माध्यमांद्वारे माझे कौतुक केले आहे याचाही मला आनंद झाला आहे, असेही सिंधू हिने सांगितले.