भारताचा आघाडीचा बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंदने मिळालेल्या संधी दवडून चुका केल्या, त्यामुळे सहाव्या डावात दुसऱ्या पराभवाला सामोरे जावे लागले. परंतु मॅग्नस कार्लसनविरुद्ध सोमवारी सातव्या डावात पुन्हा लढताना दमदार विजयासह पुनरागमन करण्याचे ध्येय आनंदने जोपासले आहे. १२ डावांची ही विश्व अजिंक्यपदाची लढत अध्र्यावर म्हणजे सहा फेऱ्यांपर्यंत आली असताना कार्लसन (३.५-२.५) एका गुणाने आघाडीवर आहे. त्यामुळे आता ‘सत्ते पे सत्ता कुणाची?’ हे उत्सुकतेचे ठरणार आहे.
पहिल्या पाच डावांमध्ये आनंदने आत्मविश्वासाने लढत दिली; परंतु शनिवारी आनंदने महत्त्वाची संधी गमावली. आनंदवर वेळेचा दबाव होता. २६ व्या चालीला कार्लसनने हत्ती जी-३ घरात घेण्याऐवजी राजा डी-२ घरात घेतला. ही मोठी चूक कार्लसनने केली. याची शिक्षा आनंदने कार्लसनला द्यायला हवी होती. डाव जिंकण्यासाठी आनंदला ही चांगली संधी प्राप्त झाली होती. यासाठी आनंदने जी-३ घरातील अश्वाने कार्लसनचे ई-५ घरातील प्यादे टिपणे क्रमप्राप्त होते; परंतु आनंदने घाईने ए-४ ही प्याद्याची चुकीची चाल रचून हातची संधी गमावली. ३२ व्या चालीला आनंदने उंटाची सी-६ ही आणखी एक चुकीची चाल रचली होती.
कार्लसन सातव्या डावात पांढऱ्या मोहऱ्यांनिशीच खेळणार आहे. आठव्या डावात मात्र आनंदला पांढऱ्या मोहऱ्यांसह खेळण्याची संधी मिळेल. दुसऱ्या पराभवानंतर मिळालेल्या विश्रांतीच्या काळात आनंदला सावरण्याची संधी मिळेल. पहिल्या विश्रांतीनंतर आनंदने विजयाचा करिश्मा दाखवला होता