बुद्धिबळाच्या सातव्या जगज्जेतेपदासाठी भारताचा ग्रँडमास्टर विश्वनाथन आनंद याला मॅग्नस कार्लसन याच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. शनिवारी सुरू होणाऱ्या पहिल्या डावापासून आक्रमक खेळ करणार असल्याचे आनंदने गुरुवारी सांगितले. गतविजेता आनंद काळ्या मोहऱ्यांनिशी या स्पध्रेतील पहिल्या डावात खेळणार आहे.
या दोन खेळाडूंमधील बारा डावांच्या लढतीला प्रत्यक्ष शनिवारी प्रारंभ होत आहे. आनंदने कार्लसनविरुद्ध आपण बचाव तंत्राऐवजी आक्रमक चालींना प्राधान्य देणार असल्याचे सांगितले. तो म्हणाला, ‘‘या लढतीसाठी मी चांगली तयारी केली आहे. घरच्या वातावरणात खेळण्यासाठी मी अतिशय उत्सुक झालो आहे. स्वत:च्या घरी खेळत असलो तरी माझ्यावर कोणतेही दडपण नाही. शहरातील वाहनांच्या गर्दीमुळे होणारे अडथळे टाळण्यासाठीच मी घरी राहण्याऐवजी हॉटेलमध्ये निवास करण्याचे ठरविले आहे.’’
आनंदने या लढतीसाठी आपल्या संघात हंगेरीचा ग्रँडमास्टर पीटर लेको, पोलंडचा रादोस्लाव्ह वोजतिझेक या परदेशी खेळाडूंबरोबरच ग्रँडमास्टर कृष्णन शशीकिरण, संदीपन चंदा यांचा समावेश केला आहे.

कार्लसन याने मात्र आपल्या सहकाऱ्यांची नावे जाहीर करण्यास नकार दिला. तो म्हणाला, ‘‘काही वेळा आपले गुपीत जाहीर करणे त्रासदायक ठरण्याची शक्यता असते. त्यामुळेच मी हा निर्णय घेतला आहे.’’
चेन्नईतील व्यवस्थेबाबत समाधान व्यक्त करीत कार्लसनने सांगितले, ‘‘एकाच ठिकाणी अधिकाधिक वेळ काढावा लागणार असला तरी येथील व्यवस्था मला अनुकूल आहे. चेन्नई हे बुद्धिबळाचे माहेरघर वाटत आहे. आनंद हा येथे किती लोकप्रिय आहे याची मला कल्पना आली आहे. त्याच्याविरुद्ध लढत देणे हे एक आव्हान असले तरी हे आव्हान पेलविण्याची क्षमता माझ्याकडे आहे.’’
या लढतीचे उद्घाटन मुख्यमंत्री जे.जयललिता यांच्या हस्ते झाले. आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघाचे उपाध्यक्ष डी.व्ही.सुंदर हेही या वेळी उपस्थित होते. या लढतीकरिता राज्य शासनाने २९ कोटी रुपयांचे प्रायोजकत्व दिले आहे. त्यापैकी १४ कोटी रुपये पारितोषिकांसाठी ठेवण्यात आले आहेत.