संपूर्ण ब्राझीलवासीयांचे आशास्थान असलेल्या नेयमारने चाहत्यांच्या अपेक्षांचे ओझे समर्थपणे पेलवत ब्राझीलला कॅमेरूनवर ४-१ असा दणदणीत विजय मिळवून दिला. नेयमारच्या दोन गोलांच्या बळावर ब्राझीलने सात गुणांसह ‘अ’ गटात अव्वल स्थान पटकावले. आता दुसऱ्या फेरीच्या (अंतिम १६ जणांच्या) लढतीत ब्राझीलची लढत चिलीशी होणार आहे.
ब्राझीलच्या विश्वचषकातील १००व्या सामन्यात नेयमारने १७व्या मिनिटालाच सुरेख गोल करत आपल्या संघाला आघाडीवर आणले. आणखी एक योगायोग म्हणजे विश्वचषक स्पर्धेतील हा १००वा गोल ठरला. जोएल मॅटिपने कॅमेरूनला बरोबरी साधून दिल्यानंतर पहिल्या सत्रात दुसरा गोल करून नेयमारने ब्राझीलच्या विजयाच्या आशा उंचावल्या. दुसऱ्या सत्राच्या सुरुवातीला फ्रेडने तिसऱ्या गोलची भर घातल्यानंतर अखेरच्या क्षणी फर्नाडिन्होने चौथा गोल करून ब्राझीलच्या विजयावर मोहोर उमटवली. मेक्सिकोने क्रोएशियावर विजय मिळवल्यामुळे ‘अ’ गटातून ब्राझील आणि मेक्सिको हे दोन संघ दुसऱ्या फेरीसाठी पात्र ठरले.

शानदार नेयमार
दुसऱ्या मिनिटालाच गोल करण्याचा प्रयत्न हुकल्यानंतर नेयमारने १७व्या मिनिटाला पहिले यश मिळवून दिले. लुइझ गुस्ताव्होने बेंजामिन मौकांदजोकडून चेंडू हिरावून घेतल्यानंतर नेयमारने हळुवारपणे चेंडूला गोलजाळ्याची दिशा दाखवली. गुस्ताव्होच्या अप्रतिम कामगिरीमुळे हा गोल होऊ शकला. लुइझ फिलिपे स्कोलारी यांच्या मार्गदर्शनाखाली उतरणाऱ्या ब्राझीलने या स्पर्धेत प्रथमच सामन्यातील पहिला गोल करण्याची करामत केली. २६व्या मिनिटाला मॅटिपने कॅमेरूनला बरोबरी साधून दिल्यानंतर ३५व्या मिनिटाला नेयमार ब्राझीलसाठी पुन्हा धावून आला. मार्सेलोच्या पासवर चेंडूवर नियंत्रण मिळवल्यानंतर त्याने मारलेला धीम्या गतीचा फटका बचावपटू निकोलस कोऊलोऊ आणि गोलरक्षक चार्लस् इटानजे यांना चकवून गोलजाळ्यात गेला.

फ्रेड, फर्नांडिन्होची सुरेख कामगिरी
दुसऱ्या सत्राचा खेळ सुरू झाल्यानंतर फ्रेडने ब्राझीलच्या खात्यात तिसऱ्या गोलची भर घातली. डेव्हिड लुइझने डाव्या बाजूने दिलेल्या पासवर फ्रेडने हा गोल केला. पण त्याने पास देताना फ्रेड ऑफसाइड स्थितीत होता. स्वीडनच्या साहाय्यक रेफरींच्या ही गोष्ट लक्षात न आल्याने फ्रेडला विश्वचषकातील पहिला गोल नोंदवता आला. मैदानावर पडल्यामुळे नेयमार अखेर माघारी परतला, पण त्याच्या जागी संधी मिळालेल्या फर्नाडिन्होने फ्रेड आणि ऑस्करच्या साथीने चौथा गोल लगावला.

फ्रेडसाठी यशदायी मिशी
आतापर्यंत अपयशी ठरलेल्या फ्रेडच्या कामगिरीवर सडाडून टीका होत होती. अखेर फ्रेडने ४९व्या मिनिटाला गोल करून टीकाकारांना सणसणीत चपराक दिली. ‘‘नशीब फुलवण्यासाठी तू मिशी काढू नकोस,’’ असा सल्ला नेयमारने फ्रेडला दिला होता. गोल केल्यानंतर नेयमारने फ्रेडला मिठी मारून सांगितले, ‘‘बघितलेस, मीच तुला सांगितले होते, मिशी काढू नकोस. नशीब आता तुझ्या बाजूने झुकले आहे.’’ फ्रेड म्हणाला, ‘‘टीकेमुळे माझ्यावरील दडपण वाढले होते, पण मी स्वत:ला शांत राखण्याचा प्रयत्न करत होतो. माझ्या कठीण काळात सहकाऱ्यांनी पाठिंबा दिल्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो.’’

ब्राझीलची सर्वोत्तम कामगिरी -नेयमार
कॅमेरूनचा ४-१ने धुव्वा उडवल्यानंतर नेयमारने ब्राझीलच्या कामगिरीचे कौतुक केले आहे. ‘‘ब्राझीलची ही या विश्वचषकातील सर्वोत्तम कामगिरी ठरली. फक्त गोलच नव्हे.. तर आमचा खेळ, प्रतिस्पध्र्यावर टाकलेले दडपण यामुळे ही सर्वोत्तम कामगिरी म्हणावी लागेल. आमची वाटचाल योग्य दिशेने सुरू असून विश्वचषक उंचावण्याचे आमचे स्वप्न पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. फुटबॉलमध्ये जवळपास सर्वच संघांनी आपल्या खेळात कमालीची सुधारणा घडवून आणल्यामुळे कोणत्याही संघाला दुबळा लेखता येत नाही. आता आमच्यासाठी प्रत्येक सामना महत्त्वाचा आहे.’’