News Flash

विश्वविजयाचे स्वप्न भंगलेले नाही!

मैदानात खेळताना त्याचा पाठीचा मणका मोडला तेव्हा जोरदार किंकाळी बाहेर पडली.. मैदानातच तो निपचित पडला होता.. कोणाचेही लक्ष त्याच्याकडे गेले नाही..

| July 7, 2014 02:02 am

मैदानात खेळताना त्याचा पाठीचा मणका मोडला तेव्हा जोरदार किंकाळी बाहेर पडली.. मैदानातच तो निपचित पडला होता.. कोणाचेही लक्ष त्याच्याकडे गेले नाही.. अखेर मार्सेलोने पंचांच्या ही बाब लक्षात आणून दिली आणि स्ट्रेचरवरून डबडबलेल्या डोळ्यांनी नेयमारला मैदान सोडावे लागले.. मणक्याला झालेली दुखापत ही गंभीर स्वरूपाची असल्याने त्याला उर्वरित विश्वचषकात खेळता येणार नसले तरी त्याचे हौसले बुलंद आहेत.
‘‘या विश्वचषकाच्या अंतिम फेरीत खेळण्याचे स्वप्न त्यांनी माझ्यापासून हिरावून घेतले, पण विश्वविजेते होण्याचे स्वप्न मात्र भंगलेले नाही,’’ असे मत भावूक झालेल्या नेयमारने हॉस्पिटलमध्ये व्यक्त केले.
चेंडूवर ताबा मिळवण्याच्या प्रयत्नामध्ये असताना कोलंबियाचा बचावपटू जुआन कॅमिलो झुनिगाचे ढोपर नेयमारच्या पाठीवर आदळले आणि यामध्ये नेयमारचा मणका दुखावला गेला. त्या वेळी मैदानावरील पंचांचे या कृत्याकडे लक्ष गेले नसले तरी झुनिगावर योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन फिफाने दिले आहे.
‘‘आयुष्य हे थांबत नसते, स्पर्धेपूर्वी आम्ही विश्वविजयाचे स्वप्न पाहिले होते आणि ते सत्यात उतरवण्यासाठी संघातील सहकारी सर्वतोपरी प्रयत्न करतील. विश्वचषकाच्या अंतिम फेरीत खेळणे हे माझे स्वप्न होते. पण ते यंदाच्या विश्वचषकात पूर्ण होऊ शकणार नाही. पण या साऱ्यावर मात करीत आम्ही विश्वविजयाचा आनंद साजरा करू,’’ असा विश्वास नेयमारने व्यक्त केला.
दुखापती या खेळाडूंच्या पाचवीलाच पुजलेल्या असतात आणि नेयमारच्या बाबतीतही विश्वचषकात हेच पाहायला मिळाले आहे. यापूर्वी चिलीविरुद्धच्या सामन्यातही नेयमारला दुखापत झाली होती. त्यामुळे कोलंबियाविरुद्धच्या सामन्यासाठी त्याच्या संघसमावेशाबाबत संदिग्धता होती. पण कोलंबियाविरुद्धच्या सामन्यात नेयमार खेळला आणि या सामन्यातील जबर दुखापतीमुळे त्याला विश्वचषकाला मुकावे लागले आहे.
याबाबत नेयमार सांगत होता की, ‘‘जे फुटबॉलच्या मैदानावर घडायला नको, अशा घटना घडताना दिसत आहेत. मैदानावरील पंच खेळाडूंना कार्ड देण्यासाठी कुचराई करताना दिसतात, पण याबाबत फिफाने पावले उचलायला हवीत.’’
नेयमार जखमी झाला तेव्हा रेफ्री कालरेस व्हेलास्को कारबालो यांनी झुनिगावर कोणतीही कारवाई केली नव्हती. पण फिफाने या प्रकरणात लक्ष घालण्याचे आश्वासन दिले आहे. नेयमारची दुखापत आणि कर्णधार थिआगो सिल्व्हाला दुसरे पिवळे कार्ड मिळाले असून हे दोघेही जर्मनीविरुद्धच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात खेळू शकणार नाहीत. या दुहेरी धक्क्यामुळे ब्राझीलचे धाबे दणाणलेले आहेत. तरी हा सामना पाहण्यासाठी तो आवर्जून उपस्थिती लावेल, असे म्हटले जात आहे.

‘‘नेयमारच्या दुखापतीबद्दल मला दु:ख झाले असून मनापासून वाईट वाटत आहे. पण नेयमारला दुखापतग्रस्त करण्याचा कोणताच विचार माझ्या मनात नव्हता. मी फक्त खेळाचा विचार करीत होतो. त्यामागे कुणाला दुखापतग्रस्त करण्याचा, कट-कारस्थान करण्याचा माझा नक्कीच हेतू नव्हता.’’
– जुआन कॅमिलो झुनिगा, कोलंबिया
‘‘नेयमारला दुखापतीतून सावरण्यासाठी जवळपास सहा आठवडय़ांचा कालावधी लागेल. सध्या नेयमार त्याच्या साओ पावलोनजीक गुआरुजा येथील घरी आहे. जेव्हा नेयमारला दुखापत झाली तेव्हा सर्वानाच धक्का बसला आणि नेमके काय घडले याचा अंदाज आला नव्हता. ड्रेसिंग रूममधील वातावरणही चिंतातुर, भयभीय आणि करुण झाले होते. तिथल्या एकाने आपण सामना गमावण्याची शक्यता आहे, अशी चिंताही व्यक्त केली होती.’’
-डॉ. जोस लुइस रुन्को, ब्राझील

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 7, 2014 2:02 am

Web Title: world cup 2014 injured neymar says world cup dream not over
टॅग : Neymar
Next Stories
1 ग्रँड स्लॅमची सप्तपदी!
2 लुइस हॅमिल्टनला जेतेपद
3 कसोटी क्रिकेट दहा देशांची मक्तेदारी नाही -श्रीनिवासन
Just Now!
X