खेळ कुठलाही असो स्टेडियममध्ये बसून सामना पाहण्याचा आनंद अनोखा असतो. आपल्या संघाला जल्लोषी पाठिंबा देणारे हे चाहते येथेच्छ धुडगूस घालतात. त्यामुळे सामना संपल्यानंतर स्टेडियममध्ये कचऱ्याचे साम्राज्य दिसते. मात्र जपानच्या चाहत्यांनी नवीन पायंडा पाडत स्टेडियम झाडून स्वच्छतेचा वसा जपला. रेसिफे येथील स्टेडियममध्ये जपानची आयव्हरी कोस्टविरुद्ध सलामीची लढत होती. या सामन्यासाठी हजारोंच्या संख्येने जपानी चाहते उपस्थित होते. मात्र त्यांच्या जल्लोषी पाठिंब्यानंतरही जपानला पराभवाला सामोरे जावे लागले. पराभवाने नाउमेद न होता त्यांनी स्टेडियममध्ये स्वच्छता अभियानाला सुरुवात केली. त्यांची ही कृती पाहून आयव्हरी कोस्टचे चाहतेही आश्चर्यचकित झाले. स्टेडियम परिसराची काळजी घेणे, हे केवळ संयोजकांचे काम नसून, आपणही त्यात हातभार लावू शकतो, हाच धडा जपानी चाहत्यांनी यानिमित्ताने दिला आहे.

सामना संपल्यानंतर मैदानातील कचऱ्याची विल्हेवाट लावणे, ही जपानमधली नियमित परंपरा आहे. मात्र अन्य देशांमध्ये असे होताना दिसत नाही. मात्र जपानी चाहत्यांनी आपल्या देशातली पर्यावरणाची काळजी घेणारी ही संस्कृती जगाला देण्याचा प्रयत्न केला आहे. खरे तर आपल्या देशाचा पराभव झाल्यावर चाहत्यांच्या भावनांचा उद्रेक होण्याची शक्यता असते. मात्र असे काहीही न करता जपानी चाहत्यांनी निसर्गाला मान देत शिस्तबद्ध पद्धतीने स्टेडियम परिसर चकाचक केला. स्टेडियम परिसराची स्वच्छता हे संयोजकांसमोरचे आव्हान असते. परंतु जपानी चाहत्यांचा वसा अन्य देशातल्या चाहत्यांनी अंगीकारल्यास स्वच्छ वातावरणात सामना पाहण्याचा आनंद सर्वानाच मिळू शकतो.