२००२च्या फिफा विश्वचषक फुटबॉल स्पध्रेत साखळीतच गारद झाल्यानंतर तब्बल १२ वर्षांनी या जागतिक व्यासपीठावर खेळणाऱ्या रशियाला पहिल्याच सामन्यात अ‍ॅलेक्झांडर कर्झाकोव्हने तारले. रशियाचा संघ खरे तर पिछाडीवर पडला होता, परंतु बदली खेळाडू म्हणून मैदानावर आलेल्या कर्झाकोव्हने तिसऱ्याच मिनिटाला गोल साधून दक्षिण कोरियाला १-१ असे बरोबरीत रोखण्याची किमया साधली.
दक्षिण कोरियाच्या खात्यावरील एकमेव गोल झळकला तोसुद्धा बदली खेळाडूकडून. ५६व्या मिनिटाला आलेल्या कियुन-हू ली याने ६८व्या मिनिटाला पहिला गोल नोंदवला. २०१८मध्ये होणाऱ्या फिफा विश्वचषकाचे यजमानपद सांभाळणाऱ्या रशियाला यंदाच्या स्पध्रेत आपली तगडी छाप पाडायची आहे. कर्झाकोव्हने या अभियानात महत्त्वाची भूमिका बजावताना आपल्या खात्यावर २६व्या गोलची नोंद केली.
‘‘आमचा खेळ अतिशय चांगला झाला,’’ असे मत रशियाचे प्रशिक्षक फॅबिओ कॅपेल्लो यांनी व्यक्त केले. रशियाचे खेळाडू आपले प्रशिक्षक कॅपेल्लो यांना ६८व्या वाढदिवसाची विजयी भेट देण्यास उत्सुक हाते. परंतु विश्वचषकातील पहिले ११ सामने निर्णायक आणि गोलवर्षांवांचे झाल्यानंतर हा दुसरा सामना बरोबरीत सुटला.