दुसऱ्या सत्रात दोन मिनिटांच्या अंतराने दोन गोल नोंदवण्याची किमया साधणाऱ्या आयव्हरी कोस्टने जपानच्या तोंडातून विजयाचा घास अक्षरश: हिरावून घेतला. ‘क’ गटातील नाटय़मय लढत आयव्हरी कोस्टने २-१ अशा फरकाने जिंकली.
किस्युके होंडाने १६व्या मिनिटाला पहिला गोल नोंदवून जपानला आघाडी मिळवून दिली. परंतु तासाभराने (६२व्या मिनिटाला) दिदिएर ड्रोग्बा बदली खेळाडू म्हणून मैदानावर आला आणि सामन्याचे चित्रच पालटले. पावसाने ओलसर झालेल्या या मैदानावर ड्रोग्बाच्या आगमनाने पाच मिनिटांत दोन गोल आयव्हरी कोस्टच्या खात्यावर जमा झाले. सर्जी ऑरिअरच्या क्रॉसवर हे दोन्ही गोल साकारले.
विल्फ्रेड बोनीने ६४व्या मिनिटाला आयव्हरी कोस्टला बरोबरी साधून दिली. त्यानंतर कोआसी गव्‍‌र्हिनोने ६६व्या मिनिटाला गोल साकारून संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. २००६ आणि २०१०मध्ये विश्वचषक स्पध्रेची साखळी फेरीसुद्धा ओलांडता न आलेल्या आयव्हरी कोस्टचा संघ दुसऱ्या फेरीत जाण्यासाठी अतिशय उत्सुक आहे.