दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार आणि सलामीचा फलंदाज फाफ डु प्लेसिस याने आपला चांगला मित्र आणि संघातील माजी खेळाडू डिव्हीलियर्ससंबंधी एक खुलासा केला आहे. विश्वचषक स्पर्धेसाठी संघ निवडण्याआधी डिव्हीलियर्सने फोन करुन आपण निवृत्ती जाहीर केली असली, तरी संघासाठी खेळण्यास तयार असल्याचं सांगितलं होतं अशी माहिती डु प्लेसिसने दिली आहहे.

पण डिव्हीलियर्सला फोन करायला खूपच उशीर झाला होता. दक्षिण आफ्रिकेच्या निवड समितीने तोपर्यंत १५ सदस्यीस संघाची निवड केली होती. दुसऱ्या दिवशी संघाची घोषणा होणार होती. त्यानुसार एबी डेव्हिलिअर्सला समाविष्ट न करता संघाची घोषणा करण्यात आली. ‘ते फक्त एक संभाषण होतं. संघाची घोषणा होण्याआधीच्या रात्री हा फोन कॉल आला होता. मला असं वाटतंय इतकंच काय ते संभाषणात बोलणं झालं होतं’, अशी माहिती डु प्लेसिसने दिली आहे.

डिव्हीलियर्स म्हणाला, निवृत्ती मागे घेतो विश्वचषक खेळू द्या ! आफ्रिकन बोर्ड म्हणालं शक्य नाही

‘मी त्याला सांगितलं की, मला वाटतं खूपच उशीर झाला आहे. तरी मी उद्या प्रशिक्षक आणि निवड समितीशी चर्चा करुन सकाळी कळवतो’, असं डु प्लेसिसने सांगितलं आहे. पावसामुळे वेस्ट इंडिडसोबतचा सामना रद्द झाल्यानंतर बोलताना डु प्लेसिसने सांगितलं की, ‘मी प्रशिक्षक आणि निवड समितीशी बोलल्यानंतर त्यांनीदेखील खूपच उशीर झाला असल्याचं सांगितलं. इतक्या मोक्याच्या क्षणी संघ बदलू शकत नाही असं ते म्हणाले’.

मात्र यामुळे आपल्या आणि डिव्हीलियर्सच्या मैत्रीवर काही परिणाम झाला नसल्याचंही डु प्लेसिसने सांगितलं आहे. ‘मी आणि डिव्हीलियर्स अजूनही तितकेच चांगले मित्र आहोत. त्याचा आमच्या मैत्रीरव काही परिणाम झालेला नाही. ही अत्यंत छोटी गोष्ट होती’, असं डु प्लेसिसने म्हटलं आहे.

तू देशाऐवजी पैशाला प्राधान्य दिलंस, शोएब अख्तरची डिव्हीलियर्सवर बोचरी टीका

याआधीही एबी डिव्हीलियर्सने आपली निवृत्ती मागे घेत, पुन्हा एकदा संघासाठी खेळण्याची तयारी दाखवल्याची माहिती समोर आली होती. मात्र आफ्रिकन क्रिकेट बोर्डाने त्याची ही विनंती मान्य केली नव्हती. अंतिम संघ जाहीर करण्याआधी डिव्हीलियर्सने आफ्रिकन बोर्डाकडे ही विनंती केल्याचं समजलं होतं.

ESPNCricinfo या संकेतस्थळाने दिलेल्या माहितीनुसार, मे महिन्यात डिव्हीलियर्सने आफ्रिकन क्रिकेट बोर्डाकडे निवृत्ती मागे घेण्याची ऑफर दिली होती. यासाठी डिव्हीलियर्सने कर्णधार डु प्लेसिस आणि प्रशिक्षक ओटीस गिब्सन यांच्याशीही संपर्क साधला होता. मात्र निवड समितीचे सदस्य लिंडा झोंडी यांनी डिव्हीलियर्सला निवृत्तीचा निर्णय मागे घेऊन विश्वचषक संघात संधी मिळणं शक्य नसल्याचं सांगितलं. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आफ्रिकन क्रिकेट बोर्डाने डिव्हीलियर्सच्या विनंतीचा विचारही केला नसल्याचं समजतंय.

२०१८ साली मे महिन्यात डिव्हीलियर्सने आपली निवृत्ती जाहीर केली. त्यामुळे विश्वचषक संघात निवड होण्यासाठीचा प्राथमिक निकष डिव्हीलियर्स पूर्ण करत नव्हता. याचसोबत मध्यंतरीच्या काळात डिव्हीलियर्सने आफ्रिकेच्या स्थानिक क्रिकेटपासूनही स्वतःला दूर ठेवलं होतं. डिव्हीलियर्सची संघात निवड केल्यास दुसऱ्या खेळाडूंवर अन्याय होईल असं मत निवड समितीमधील काही सदस्यांनी व्यक्त केलं. याच कारणांमुळे डिव्हीलियर्सचं पुनरागमन आफ्रिकन क्रिकेट बोर्डानेच नाकारलं.