यंदाच्या विश्वचषक स्पर्धेमध्ये सध्या चांगलीच रंगत आली आहे. प्रत्येक संघ उपांत्य फेरीत पोहचण्यासाठी प्रयत्नशील आहे. मात्र अफगाणिस्तान संघाचे या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे. विश्वचषक स्पर्धा सुरू झाल्यापासून गुणतालिकेत अफगाणिस्तानचा संघ तळाशीच राहिला. पाच सामन्यात अफगाणिस्तान संघाला अद्याप एकही विजय मिळवता आलेला नाही. शून्य गुणांसह अफगाणिस्तान संघाचे आव्हान संपुष्टात आले आहे. या स्पर्धेतून बाहेर पडणारा अफगाणिस्तानचा संघ पहिला असेल.

यंदाची विश्वचषक स्पर्धा राऊंड रॉबिन पद्धतीने खेळवली जात आहे. या स्पर्धेत १० संघांनी भाग घेतला आहे. पहिल्या फेरीत प्रत्येक संघाला अन्य संघाबरोबर खेळत आहे. त्यामुळे प्रत्येकाचे ९ सामने होणार आहेत. ९ पैकी अफगाणिस्तानच्या संघाला पाच सामन्यात पराभवाचा धक्का पहावा लागाला आहे. गुणतालिकेत ते तळाशी आहे. अफगाणिस्तान संघाचे अद्याप चार सामने बाकी आहेत. त्यांनी चारही सामन्यात विजय मिळवला तरी त्यांना उपांत्यफेरीत स्थान मिळण्याची शक्यता ढासळली आहे.

अफगाणिस्तानचा संघ स्पर्धेतून बाहेर जरी पडला असला तरी एखाद्या तगड्या संघासाठी डोकेदुखी ठरू शकतो. उर्वरित सामन्यात विजय मिळवून शेवट गोड करण्याचा अफगाणिस्तानचा प्रयत्न असेल. अफगाणिस्तान संघाचे उर्वरित सामने भारत, बांगलादेश, पाकिस्तान आणि विंडीजबरोबर आहेत.

अफगाणिस्तानशिवाय श्रीलंका, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका आणि विंडीज संघाचेही स्पर्धेतील आव्हान खडतर आहे. विंडीज, दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तान संघाचे पाच सामन्यात फक्त तीन गुण आहेत. बांगलादेश संघाचे पाच सामन्यात पाच गुण आहेत.तर श्रीलंका संघाचे पाच सामन्यात चार गुण आहेत. ८ गुणांसह इंग्लंडचा संघ सध्या अव्वल स्थानावर आहे. ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि भारत अनुक्रमे दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर आहेत.

दरम्यान, मंगळवारी झालेल्या सामन्यात यजमान इंग्लंडने दुबळ्या अफगाणिस्तानावर १५० धावांनी एकतर्फी विजय मिळवला. कर्णधार मॉर्गनच्या झंझावाती १४८ धावांच्या बळावर इंग्लंडने अफगाणिस्तानपुढे ३९८ धावांचे डोंगराएवढे आव्हान ठेवले होते. पण अफगाणिस्तानला केवळ ८ बाद २४७ धावांपर्यंतच मजल मारता आली.