गौरव जोशी

लंडनच्या हिथ्रोपासून ते वेम्बलेच्या गल्लीबोळ्यापर्यंत सध्या फक्त एकच चर्चा सुरू आहे, ती म्हणजे भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामन्याची. सकाळी १०.३० वाजता (इंग्लंडच्या वेळेनुसार) सामना सुरू होणार असल्यामुळे सकाळी किती वाजता निघावे, त्याशिवाय भारतीय संघाला पाठिंबा दर्शवण्यासाठी काय योजना काढाव्या, यांसारख्या चर्चाना उधाण आले आहे. या परिसरात भारतीयांचे मोठय़ा प्रमाणात वास्तव्य आहे.

साऊदम्पटन येथील या सामन्यासाठी लंडनमधील चाहत्यांना जवळपास १३० किमी अंतर पार करून स्टेडियम गाठावे लागणार आहे. ‘एम थ्री’ या द्रुतगती महामार्गावर प्रवेश करताच उद्या किती वाहतूक असेल, याचा अंदाज येतो. भारताच्या प्रत्येक सामन्यात आपली काही तरी खास ओळख निर्माण करायची, या हेतूने कमीतकमी १० हजार भारतीय चाहते लंडनहून या सामन्यासाठी जाणार असल्याने हा अनुभव संस्मरणीय ठरणार आहे. विशेषत: भारत आर्मीने ढोल, ताशे, झेंडय़ाबरोबरच विविध गाणीसुद्धा तयार केली असून गाणी गातगातच ते ‘एम थ्री’ हा महामार्ग सर करतील. बांगलादेशच्या चाहत्यांनी रविवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात मोठय़ा प्रमाणावर आवाज केला होता, मात्र बुधवारी भारतीय पाठीराख्यांचा कल्लोळ पाहून तेसुद्धा शांत होतील.

साऊदम्पटनच्या रोस बाऊल स्टेडियमच्या शेजारी एक पंचतारांकित हॉटेल आहे. या हॉटेलच्या बाल्कनीतून थेट सामना पाहण्याची संधी मिळत असल्याने येथील बहुतांश खोल्यांचे भारतीय चाहत्यांनी विश्वचषकाच्या सहा ते आठ महिन्यांपूर्वीच आरक्षण केले होते. या हॉटेलमधील फक्त एका दिवसाच्या वास्तव्यासाठी चाहते मोठी किंमतसुद्धा मोजत आहेत. काही चाहते सोमवारी रात्रीच हॉटेलमध्ये जाणार असून, काऊंटी क्रिकेट खेळणारा भारतीय क्रिकेटपटू अजिंक्य रहाणेसुद्धा याच हॉटेलमधून सामना पाहणार असल्याने येथे सध्या फक्त भारतीय चाहत्यांचीच गर्दी दिसत आहे, अशी माहिती मिळत आहे.

भारतीय संघाचे विश्वचषकाचे वेळापत्रक जेव्हा जाहीर झाले, तेव्हापासूनच ही सर्व तयारी सुरू असून बुधवारी स्टेडियममध्ये दक्षिण आफ्रिकेचे फक्त हातावर मोजण्याइतके पाठीराखे दिसतील, असे मला वाटते. ‘टायटॅनिक’ हे लोकप्रिय जहाज ली साऊदम्पटन येथूनच निघाली होती. त्यामुळे या शहराला ऐतिहासिक महत्त्वसुद्धा असून सामन्याच्या आदल्या दिवसापासूनच विराट कोहली आणि महेंद्रसिंह धोनी यांच्या अनुक्रमे १८ आणि ७ क्रमांकांच्या जर्सी घातलेले चाहते येथे मोठय़ा प्रमाणात दिसत आहेत. त्यामुळे साऊदम्पटनमध्ये बुधवारी ‘निळे सागर’ आढळल्यास कोणालाही आश्चर्य वाटणार नाही.