ICC World Cup 2019 : इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या विश्वचषक स्पर्धेत भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात ३६ धावांनी विजय मिळवला. उद्या (बुधवारी) त्यांचा सामना पाकिस्तानविरुद्ध होणार आहे. पण या सामन्याआधी ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का बसला आहे. ऑस्ट्रेलियाचा एक महत्वाचा खेळाडू दुखापतीमुळे या सामन्याला मुकणार आहे.

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्यात शिखर धवनच्या शतकाच्या जोरावर भारताने ऑस्ट्रेलियाला ३५३ धावांचे आव्हान दिले होते. हे आव्हान पार करताना ऑस्ट्रेलियाला केवळ ३१६ धावांपर्यंतच मजल मारता आली. या विश्वचषक स्पर्धेत हा त्यांचा पहिलाच पराभव झाला. तसेच आव्हानाचा पाठलाग करताना १९९९ च्या विश्वचषक स्पर्धेनंतर ऑस्ट्रेलियाचा हा पहिलाच पराभव ठरला. या सामन्यात महेंद्रसिंग धोनी याचा एका हाताने भन्नाट झेल टिपणारा मार्कस स्टॉयनीस याला दुखापतीमुळे पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याला मुकावे लागणार आहे. त्याची जागा घेण्यासाठी अष्टपैलू खेळाडू मिचेल मार्श याने ऑस्ट्रेलियातून इंग्लंडची विमान उड्डाण केले आहे.

गेल्या सामन्यात भारताविरुद्ध मार्कस स्टॉयनीसने शेवटचे षटक टाकले होते. त्यावेळी शेवटच्या षटकात दमदार फटकेबाजी करण्याच्या विचाराने धोनीने फटका लगावला. जमिनीच्या जवळ असलेला फुल टॉस (Low full toss) चेंडू धोनीने पूर्ण ताकदीनिशी टोलवला, पण अत्यंत चपळाईने स्टॉयनीसने तो चेंडू एका हाताने रोखला आणि भन्नाट असा झेल टिपला.

Video : स्टॉयनीसने धोनीचा टिपलेला भन्नाट झेल पाहिलात का?

या सामन्यात धोनीने १४ चेंडूत २७ धावा केल्या. तर स्टॉयनीसने ७ षटके फेकली होती. या सामन्यात त्याने ६२ धावा देऊन २ बळी टिपले होते.