विश्वचषकाच्या अखेरच्या साखळी सामन्यात दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाच्या संघाला दणका देत १० धावांनी पराभव करत विश्वचषकातील आपला समारोप गोड केला. अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या या सामन्यात आफ्रिकेच्या ३२५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचा डाव ३१५ धावांमध्ये आटोपला.

ऑस्ट्रेलियाकडून दमदार फॉर्ममध्ये असलेल्या सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने शानदार शतकी खेळी(११७ चेंडूंत १२२ धावा ) करत एक बाजू सावरून धरली होती. मात्र, दुसऱ्या बाजूनं ठराविक अंतरानं गडी बाद होत गेले. सलामीवीर फिंच अवघ्या तीन धावांत तंबूत परतला. त्यानंतर आलेले उस्मान ख्वाजा, स्टीव्ह स्मिथ, मार्कस स्टॉयनिस व ग्लेन मॅक्सवेल स्वस्तात बाद झाले. वॉर्नरला अॅलेक्स कॅरीने चांगली साथ दिली. सहाव्या क्रमांकावर फंलदाजीसाठी आलेल्या अॅलेक्स कॅरी यानं ६९ चेंडूत ८५ धावांची खेळी केली. दोघं संघाला विजय मिळवून देतील असं वाटत असतानाच वॉर्नरपाठोपाठ कॅरीही बाद झाला. यानंतर आलेल्या मायकल स्टार्कने फटकेबाजी करत ऑस्ट्रेलियाला लक्ष्याजवळ आणलं मात्र झटपट विकेट पडल्याने ऑस्ट्रेलियाचा संघ 315 धावाच करु शकला. आफ्रिकेकडून कागिसो रबाडाने सर्वाधिक तीन बळी बळी घेतले.

यापूर्वी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना फाप डुप्लेसिसने तडाखेबंद शतकी खेळी केली. डुप्लेसिसला क्विंटन डी कॉक (५२) व रासी दुसेन (९५) यांनी दमदार साथ दिली. डुप्लेसिसने ९४ चेंडूंमध्ये १०० धावा केल्या. त्याच्या खेळीमुळे आफ्रिकेने सहा गड्यांच्या मोबदल्यात ३२५ धावांचं आव्हान ऑस्ट्रेलियासमोर ठेवलं होतं.