गेले काही दिवस टीम इंडियाच्या भगव्या जर्सीवरुन सुरु असलेला संभ्रम अखेर आज संपलेला आहे. बीसीसीआयने इंग्लंडविरुद्धच्या सामन्यासाठी टीम इंडियाच्या भगव्या जर्सीचे फोटो आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन जाहीर केले आहेत. रविवारी इंग्लंडविरुद्ध सामन्यात टीम इंडिया नवीन जर्सी घालून मैदानात उतरणार आहे.

गेल्या काही दिवसांत अनेक प्रसारमाध्यमं आणि सोशल मीडियावर टीम इंडियाच्या भगव्या जर्सीचे फोटो फिरत होते. यावरुन भारतामध्ये राजकारणही सुरु झालं. काँग्रेस आणि समाजवादी पक्षाच्या काही नेत्यांनी या जर्सीला विरोध दर्शवला. मध्यंतरीच्या काळात भारताचे गोलंदाजी प्रशिक्षक भारत अरुण यांनी जर्सीच्या रंगाबद्दल आम्हाला काहीही माहिती नसल्याचं सांगत अजुन संभ्रम वाढवला.

नवीन जर्सीमध्ये समोरचा भाग हा निळ्या रंगाचाच ठेवण्यात आला असून दोन्ही हात आणि पाठीमागचा संपूर्ण भाग भगव्या रंगात ठेवण्यात आला आहे. २०१९ विश्वचषक स्पर्धेसाठी आयसीसीने Home आणि Away ही संकल्पना राबवली होती. त्यानुसार एकाच रंगाची जर्सी घालून खेळणाऱ्या संघाना Home आणि Away सामन्यांकरता वेगवेगळ्या जर्सी घालणं बंधनकारक होतं. त्यामुळे ही नवीन जर्सी घालून टीम इंडिया इंग्लंडविरोधात कसा खेळ करते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.