ICC World Cup 2019 ही स्पर्धा ३० मे पासून सुरु होणार आहे. या आधी होणाऱ्या सराव सामन्यांचे वेळापत्रक ICC कडून ३१ जानेवारीला जाहीर करण्यात आले. भारतीय संघ या वेळी २ संघांशी सराव सामने खेळणार आहे. भारताचा पहिला सराव सामना २५ मे रोजी न्यूझीलंडविरुद्ध होणार आहे. तर दुसरा सराव सामना बांगलादेशशी २८ मे रोजी होणार आहे. या सराव सामन्यानंतर ICC World Cup 2019 रंगणार आहे.

भारताविरुद्धच्या सामन्याआधी न्यूझीलंडच्या संघाला एक मोठा धक्का बसलाया आहे. न्यूझीलंडचा यष्टीरक्षक टॉम लॅथम हा दुखापतीमुळे जायबंदी झाला आहे. त्यामुळे त्याला दोनही सराव सामन्यांना मुकावे लागणार आहे. न्यूझीलंडचा एक सराव सामना २५ मे रोजी तर दुसरा सराव सामना २८ मे रोजी होणार आहे. आतापर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकही सामना न खेळलेला टॉम ब्लंडेल याला या २ सराव सामन्यात यष्टिरक्षणाची संधी मिळणार आहे. “दुखापतीमुळे टॉम लॅथम दोन सराव सामन्यांमध्ये खेळणार नाही. पण तो लवकर तंदुरुस्त होईल आणि संघात पुनरागमन करेल अशी आम्हाला आशा आहे”, अशी माहिती न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन याने दिली.

दरम्यान, टीम इंडिया विश्वचषकाच्या ८ दिवस आधीच इंग्लंडला रवाना झाली आहे. इंग्लंडमध्ये पोहोचल्यानंतर विश्वचषकाचे मूळ सामने सुरु होईपर्यंत टीम इंडियाचे एक वेगळे वेळापत्रक आहे. आज (२४ मे) ओव्हल मैदानावर टीम इंडियाचे पहिले पूर्ण सराव सत्र असणार आहे. त्यानंतर सर्व कर्णधारांच्या पत्रकारांशी औपचारिक गप्पा होतील. त्यानंतर उद्या (२५ मे) न्यूझीलंडविरुद्ध पहिला सराव सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी ३ वाजता खेळला जाईल. २७ मे रोजी कार्डिफच्या सोफिया गार्डन्स मैदानावर भारतीय संघाचे सराव सत्र असणार आहे. त्यानंतर पत्रकार परिषद व दिवसअखेरीस संघातील वरिष्ठ अनुभवी खेळाडू आणि संघ व्यवस्थापन यांची बैठक असेल. त्यानंतर २८ मे रोजी बांगलादेशशी दुसरा सराव सामना होईल आणि २९ मे रोजी साऊदम्पटन येथे कर्णधार विराट कोहली आणि इतर संघाच्या कर्णधारांचे बकिंगहॅम पॅलेस येथे इंग्लंडच्या क्वीन यांच्यासोबत चहापान होणार आहे.

इंग्लंडमध्ये हा विश्वचषक खेळवला जाणार आहे. या स्पर्धेत भारताचा सलामीचा सामना ५ जून रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणार आहे. तर पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध भारत १६ जूनला मैदानात उतरणार आहे. २०१९ विश्वचषक स्पर्धेतील सामने हे रॉबिन-राऊंड पद्धतीने खेळवले जाणार आहे. या प्रकारात प्रत्येक संघ प्रत्येक प्रतिस्पर्ध्या विरोधात एक सामना खेळणार आहे. यानंतर सर्वोत्तम ४ संघ उपांत्य फेरीत दाखल होणार आहेत.