19 October 2019

News Flash

World Cup 2019 : पंतला वगळल्यामुळे आश्चर्याचा धक्का – गावसकर

पंत ऐवजी अनुभवी दिनेश कार्तिकला संघात स्थान

माजी क्रिकेट कर्णधार सुनील गावस्कर

युवा आणि गुणी यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी भारतीय संघातून वगळल्याचे मला आश्चर्य वाटत आहे, अशी प्रतिक्रिया माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी व्यक्त केली.
विश्वचषकाच्या भारतीय संघात पंतऐवजी अनुभवी दिनेश कार्तिकची पर्यायी यष्टीरक्षक म्हणून संघात निवड करण्यात आली.

त्याविषयी गावस्कर म्हणाले, ‘‘पंतने गेल्या काही महिन्यांत दमदार कामगिरी केली. फक्त ‘आयपीएल’मध्येच नव्हे, तर त्यापूर्वी झालेल्या इंग्लंड-ऑस्ट्रेलिया दौऱ्यातही त्याने छाप पाडली होती. यष्टीरक्षणातदेखील त्याने बऱ्यापैकी सुधारणा केली आहे. त्याशिवाय शिखर धवनव्यतिरिक्त एकही डावखुरा फलंदाज पहिल्या सहा खेळाडूंत नसल्यामुळे पंतचा समावेश करणे उपयुक्त ठरले असते.’’

कार्तिकच्या निवडीचीही त्यांनी पाठराखण केली. ते म्हणाले, ‘‘विश्वचषकात कधीही असा दिवस येऊ शकतो, जेव्हा महेंद्रसिंह धोनीला तापामुळे अथवा दुखापतीमुळे माघार घ्यावी लागू शकते. अशा परिस्थितीत तुम्हाला अनुभवी यष्टीरक्षकाची गरज भासू शकते. कार्तिकला यष्टीरक्षणाचे उत्तम कौशल्य अवगत आहे. या जमेच्या बाजूमुळेच त्याची विश्वचषकासाठी संघात निवड झाली असावी.’’

संघनिवडीत तुम्ही प्रत्येकालाच आनंदी करू शकत नाही. कार्तिकची निवड झाल्यामुळे मीदेखील आश्चर्यचकित झालो आहे, परंतु धोनीनंतर सध्या तरी भारताकडे तोच सर्वोत्तम यष्टीरक्षक उपलब्ध आहे. त्याशिवाय मध्यक्रमात तो संयम बाळगून फलंदाजीही करू शकतो. – संजय मांजरेकर, माजी क्रिकेटपटू

पंतचा विश्वचषकासाठी भारतीय संघात समावेश नाही. भारताची निवड समिती नक्कीच वेडी आहे. – मायकल वॉन, इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू

काही आठवडय़ांपूर्वीच पंतचा ‘बीसीसीआय’च्या करारात अ-श्रेणीत समावेश करण्यात आला होता. त्यामुळे त्याला वगळण्यामागचे कारण अनाकलनीय आहे. चौथ्या क्रमांकावर विजय शंकर हमखास यशस्वी होईलच, असे नाही. – आकाश चोप्रा, माजी क्रिकेटपटू व समालोचक

First Published on April 16, 2019 1:19 am

Web Title: world cup 2019 exclusion of rishabh pant from team india squad is surprising says sunil gavaskar