विश्वचषक स्पर्धा २०१९ च्या अंतिम सामन्यात सुपर ओव्हरच्या माध्यमातून इंग्लंड नवा विश्वविजेता ठरला. न्यूझीलंडने ५० षटकात २४१ धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडनेदेखील २४१ धावाच केल्या. त्यामुळे सामन्यात सुपर ओव्हर खेळवण्यात आली. सुपर ओव्हरमध्येही सामना अनिर्णित राहिला. त्यामुळे सर्वाधिक चौकार-षटकारांच्या निकषावर इंग्लंडला विश्वविजेता ठरवण्यात आले.

या सामन्यामध्ये प्रचंड थरार पाहायला मिळाला. मूळ सामना अनिर्णित राहिला. त्यामुळे सामना सुपर ओव्हरमध्ये गेला. सुपर ओव्हरमध्ये प्रथम इंग्लंडने फलंदाजी करत १५ धावा केल्या आणि विजयासाठी न्यूझीलंडला १६ धावांचे आव्हान मिळाले. त्यावेळी इंग्लंडकडून नवख्या जोफ्रा आर्चरला सुपर ओव्हर टाकण्याची संधी देण्यात आली. सामन्यात प्रचंड दडपणाची स्थिती होती, त्यामुळे नवखा जोफ्रा आर्चरदेखील थोडा दबावात होता. अशा वेळी सामन्याचा नायक बेन स्टोक्स याने आर्चरला कानमंत्र दिला. ‘आजचा विजय किंवा पराभव तुझी क्रिकेट कारकीर्द ठरवू शकत नाही. (त्यामुळे तुला हवी तशी गोलंदाजी कर. दडपण घेऊ नको)’, असा सल्ला त्याने आर्चरला दिला होता.

स्टोक्सने २०१६ च्या टी २० विश्वचषकातील अंतिम सामन्यात शेवटचे षटक टाकले होते. त्यावेळी विंडीजला विजयासाठी १९ धावा हव्या होत्या. कार्लोस ब्रेथवेटने त्या वेळी झंजावाती ४ षटकार खेचून सामना जिंकला होता. दबावाच्या स्थितीमध्ये कशी अवस्था होते याचा अंदाज स्टोक्सला होता. त्यामुळे त्याने आर्चरला सल्ला दिला आणि आर्चरने देखील सल्ला नीट ऐकला. परिणामी इंग्लंडला पहिलेवहिले विश्वविजेतेपद मिळाले. जो रूटनेही त्याला सल्ला दिला होता. ‘स्टोक्स आणि रूट यांच्या सल्ल्यानंतर माझ्यावरील दबाव कमी झाला. आज जरी आपण पराभूत झालो, तरीही हा जगाचा अंत नाही हे मी स्वतःला समजावले आणि म्हणून मला चांगली कामगिरी करता आली’, असे आर्चरने सामन्यानंतर सांगितले.

दरम्यान, नाणेफेक जिंकून न्यूझीलंडने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पण त्यांचा हा निर्णय फसला. इंग्लंडच्या वेगवान माऱ्यापुढे न्यूझीलंडला केवळ २४१ धावांपर्यंतच मजल मारता आली. न्यूझीलंडकडून एक बाजू लावून धरत सलामीवीर हेन्री निकोल्स याने संयमी अर्धशतक केले. त्याने ५५ धावांची खेळी केली. तर डावाच्या शेवटच्या टप्प्यात टॉम लॅथम याने ४७ धावांची उपयुक्त खेळी केली. इतर फलंदाजांना मात्र चांगली खेळी करता आली नाही. ख्रिस वोक्स आणि लिअम प्लंकेट या दोघांनी ३-३ बळी टिपले.

या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडची सुरुवात अत्यंत खराब झाली. पण बेन स्टोक्स आणि जोस बटलर या दोघांनी मोठी भागीदारी करून इंग्लंडच्या आशा पल्लवित केल्या. या दोघांनीही अर्धशतकी खेळी केली. सामन्यात बटलर बाद झाल्यावर इंग्लंडच्या आशा काहीशा मावळल्या पण स्टोक्सने शेवटपर्यंत तग धरून सामना सुपर ओव्हरमध्ये नेला. सुपर ओव्हरमध्येही सामना बरोबरीत (१५ धावा) सुटला, त्यामुळे मूळ सामन्यातील चौकार षटकारांच्या निकषावर इंग्लंडला नवा विश्वविजेता जाहीर करण्यात आले.