ICC World Cup 2019 : क्रिकेट विश्वचषक स्पर्धेसाठी आता अवघे काही दिवस शिलकी आहेत. या स्पर्धेसाठी सारेच संघ करत आहेत. संघातील प्रत्येक खेळाडू आपल्या कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी करण्याच्या उद्देशाने मैदानात उतरणार आहे. या संघामध्ये समतोल कसा राखावा, याबाबत क्रिकेट जगतातील जाणकार आपापली मतं व्यक्त करत आहेत. यात भारताचे माजी क्रिकेटपटू मोहिंदर अमरनाथ यांनी त्यांचे मत व्यक्त केले आहे.

संघात प्रतिभावान अष्टपैलू खेळाडू असणे हे संघासाठी आवश्यक आहे. त्यांच्यामुळे संघ समतोल राहण्यास मदत होईल. पण त्या अष्टपैलू खेळाडूंनी फलंदाजी आणि गोलंदाजी या दोनही आघाड्यांवर चांगली कामगिरी करणे आवश्यक आहे, असे मत मोहिंदर अमरनाथ यांनी मांडले. भारताने १५ एप्रिलला आपला संघ जाहीर केला असून या संघात हार्दिक पांड्या, विजय शंकर आणि रवींद्र जाडेजा हे तीन अष्टपैलू खेळाडू आहेत.

“तुमच्या संघात किमान २ ते ३ अष्टपैलू खेळाडू असायला हवेत. तसे असेल तेव्हाच तुमचा संघ समतोल आहे असे म्हणता येईल. त्यामुळे संघातील कोणत्या खेळाडूंना संधी द्यायची आणि कोणत्या खेळाडूंना संघाबाहेर ठेवायचे याबाबत संघ व्यवस्थापनाला निर्णय घेणे सोपे जाते. पांढऱ्या चेंडूंबाबत बोलायचे झाले तर तो चेंडू गोलंदाजांना फारसा मदत करत नाही. तसेच इंग्लंडमध्ये हिरवळीच्या खेळपट्ट्यादेखील फारशा नाहीत. याशिवाय तेथील त्या वेळचे वातावरण याचादेखील सामन्यावर काही प्रमाणात परिणाम होऊ शकतो. अष्टपैलू खेळाडू हा जर वरच्या फळीतील फलंदाज असेल तर संघाचा समतोल अधिक चांगला राखला जातो, असे अमरनाथ म्हणाले.

फलंदाजीच्या क्रमवारीत सातव्या, आठव्या किंवा नवव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेल्या फलंदाजाकडून कोणत्याही मोठ्या पराक्रमाची अपेक्षा करणे चुकीचे आहे. कारण तेव्हा फार उशीर झालेला असतो. त्यामुळे मला असे वाटते की अष्टपैलू खेळाडू हा पहिल्या ६ फलंदाजांमध्ये खेळणारा आणि १० षटके टाकणारा असाच असायला हवा, असेही ते म्हणाले.

विश्वचषकासाठी १५ जणांची टीम इंडिया –

विराट कोहली (कर्णधार)
रोहित शर्मा (उपकर्णधार)
शिखर धवन
लोकेश राहुल
महेंद्रसिंग धोनी (यष्टीरक्षक)
हार्दिक पांड्या
विजय शंकर
केदार जाधव
मोहम्मद शमी
भुवनेश्वर कुमार<br />कुलदीप यादव<br />युझवेंद्र चहल
दिनेश कार्तिक (राखीव यष्टीरक्षक)
जसप्रित बुमराह
रवींद्र जाडेजा