भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी यांच्याबाबत केलेल्या विधानामुळे गेले काही दिवस कुलदीप चर्चेत आहे. मात्र कुलदीपने केलेल्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ घेण्यात आला असल्याचा डाव कुलदीपने स्वतः केला होता. त्यानंतर आता आणखी एका गोष्टीमुळे कुलदीप चर्चेत आला आहे. टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली याने मला मैदानावर गोलंदाजी करताना स्वातंत्र्य दिले, त्यामुळेच मला यशस्वी होता आले, असे मत कुलदीपने व्यक्त केले. नुकताच कुलदीपला वर्षभरात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल पुरस्कार प्रदान करण्यात आला.

“कर्णधाराने तुम्हाला कायम पाठिंबा द्यायला हवा. त्याने तुमच्यात असलेली प्रतिभा ओळखायला हवी आणि त्यानुसार कामगिरी करण्यासाठी गोलंदाजाला प्रेरणा द्यायला हवी. जर कर्णधाराने आम्हाला मैदानावर गोलंदाजी करताना स्वातंत्र्य दिले नाही, तर मात्र गोलंदाजाला यशस्वी होणे शक्य नाही.”, असे कुलदीप म्हणाला.

“IPL हे विश्वचषक स्पर्धेपेक्षा पूर्णपणे वेगळे असते. असे अनेक खेळाडू आहेत, जे IPL मध्ये चांगली कामगिरी करतात, पण आंतरराष्ट्रीय स्तरावर फारसे चांगले काम करता येत नाहीत. मी गोलंदाज म्हणून संघात स्थान मिळवले आहे. त्यामुळे IPL मधील खराब कामगिरीचा माझ्या टीम इंडियातील कामगिरीवर काहीही परिणाम होणार नाही”, असे कुलदीप म्हणाला.

“टी २० हा एक असा क्रिकेटचा प्रकार आहे, ज्या प्रकारात सामान्यतः फलंदाजांचे वर्चस्व असते. गोलंदाज एखाद्या दिवशी भयंकर महागडा ठरू शकतो. मी काही जादूगार नाही, त्यामुळे मलाही त्या दिवसाला सामोरे जावे लागले. पण विश्वचषक स्पर्धेत मी किती बळी टिपू शकेन याबाबत मी आताच फारसे काही बोलू शकणार नाही”, असेही कुलदीपने स्पष्ट केले.