२०१९ विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानचं स्पर्धेतलं आव्हान संपुष्टात आलंय. बांगलादेशला विजयासाठी ३१६ धावांचं आव्हान दिल्यानंतर, पाकिस्तानी गोलंदाजांना बांगलादेशला ७ धावांच्या आत बाद करायचं होतं. मात्र हे काम करण्यात ते अपयशी ठरले. त्याआधी इमाम उल-हक आणि बाबर आझम यांच्या आक्रमक खेळाच्या जोरावर पाकिस्तानने ३०० धावांचा टप्पा ओलांडला. इमाम उल-हकने १०० चेंडूत १०० धावांची खेळी केली.

मात्र इमामला आपल्या या शतकाचा फारसा आनंद घेता आला नाही. शतक झळकावल्यानंतर इमाम उल-हक हिटविकेट होऊन माघारी परतला. मुस्तफिजूर रहेमानच्या गोलंदाजीवर हा प्रकार घडला. इमामच्या या हिटविकेटमुळे, क्रिकेटप्रेमींना पाकिस्तानचा माजी खेळाडू इंझमाम फल-हकची आठवण झाली. आपल्या स्थुल देहयष्टीसाठी ओळखला जाणारा इंझमाम उल-हक अनेकदा हिटविकेट झालेला आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे इमाम उल-हक हा इंझमाम उल-हकचा पुतण्या आहे.

नाणेफेक जिंकून पाकिस्तानचा कर्णधार सरफराज अहमदने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सलामीवीर फखार झमान मोहम्मद सैफुद्दीनच्या गोलंदाजीवर माघारी परतला. यानंतर इमाम उल-हक आणि बाबर आझम यांनी दुसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी रचत पाकिस्तानचा डाव सावरला. इमाम उल-हकने १०० चेंडूत १०० धावा झळकावत संघाचा डाव सावरण्यात मोलाची भूमिका बजावसी. दोघांनीही दुसऱ्या विकेटसाठी १५७ धावांची भागीदारी केली. सैफुद्दीनने बाबर आझमला माघारी धाडत पाकिस्तानची जमलेली जोडी फोडली.