भारताच्या पुलवामा सेक्टरमध्ये १४ फेब्रुवारीला दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात ४०हून अधिक जवान शहीद झाले. याचे पडसाद सर्वत्र उमटत आहेत. क्रीडा क्षेत्रातील जाणकार, क्रिकेट संघटना व चाहतेदेखील आपला रोष व्यक्त करत आहेत. विविध क्रिकेट संघटनांनी पाकिस्तानी खेळाडूंचे फोटो काढून टाकले आहेत. तसेच, ICC World Cup 2019 स्पर्धेत भारताने पाकिस्तानविरुद्धचा सामना खेळू नये, असा सूरही उमटत आहे. या दरम्यान, ICC एक महत्वपूर्ण माहिती दिली आहे.

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना नियोजित वेळापत्रकाप्रमाणेच होणार, असे स्पष्ट संकेत ICC चे CEO डेव्ह रिचर्डसन यांनी दिले आहेत. भारत पाक सामन्याच्या साशंकतेबाबत त्यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना ते म्हणाले की नियोजित वेळापत्रकाप्रमाणे सामने होणार नाहीत ,अशी सध्या कोणत्याही सामन्याची स्थिती नाही. त्यामुळे विश्वचषक स्पर्धेत सर्व सामने ठरल्याप्रमाणेच होतील.

इंग्लंडच्या ओल्ड ट्रॅफोर्ड स्टेडियममध्ये १६ जूनला होणाऱ्या भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यासाठी २५ हजार प्रेक्षकसंख्या असलेले मैदान उपलब्ध आहे. मात्र या सामन्यासाठी तब्बल ४ लाख क्रिकेटप्रेमींचे अर्ज आलेले आहेत, अशी माहितीही ICC ने दिली आहे. ICC World Cup 2019 स्पर्धेचे संचालक स्टीव्ह एलवर्थी म्हणाले की भारत विरुद्ध पाकिस्तान हा सामना साखळी फेरीतील सामना आहे. त्याप्रमाणेच साखळी फेरीतील इंगलण्ड विरुद्ध ऑस्ट्रेलिया या सामनादेखील पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांचा आहे. पण या सामन्यापेक्षाही भारत-पाक सामन्याच्या तिकिटासाठी सुमारे ४ लाख अर्ज आले आहेत. विश्वचषकासंदर्भात झालेल्या एका कार्यक्रमात त्यांनी ही माहिती दिली.

भारत पाक सामन्यासाठी जे स्टेडियम नियोजित आहे, तिथे केवळ २५ हजार आसनक्षमता आहे. त्यामुळे अनेकांना तिकिटे मिळणार नसल्याने भारत पाक सामना झाला तरीदेखील मोठ्या प्रमाणावर प्रेक्षक निराश होणार आहेत. हे केवळ स्थानिक पातळीवर आम्ही सांगतो आहोत. पण जागतिक पातळीवर ही संख्या आणखी वाढू शकते, असेही ते म्हणाले.