भारतात सध्या IPL चा हंगाम सुरु आहे. विश्वचषकाला अवघे काहीच दिवस शिल्लक असून IPL संपल्यावर विश्वचषकाच्या चर्चा रंगतील यात वादच नाही. या विश्वचषकातील सर्वात चर्चेची गोष्ट म्हणजे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना… १६ जूनला मॅन्चेस्टरमध्ये ओल्ड ट्रॅफॉर्ड स्टेडियमवर भारत आणि पाकिस्तान हे पारंपरिक प्रतिस्पर्धी क्रिकेटच्या मैदानावर भिडणार आहेत. पुलवामा हल्ल्याच्या पार्श्र्वभूमीवर हा सामना होणार की नाही? भारतीय संघ पाकिस्तानविरुद्ध हा सामना खेळणार की नाही? याबाबत अजूनही स्पष्टता आलेली नाही. पण चाहत्यांमध्ये अजूनही या सामन्याचा उत्साह कायम आहे.

भारत आणि पाकिस्तान यांच्यात होणार असलेल्या सामन्याची तिकिटे विक्रीसाठी उपलब्ध झाल्यानंतर अवघ्या दोन दिवसात सर्व तिकिटे विकली गेल्याची माहिती देण्यात येत आहे. भारताच्या पुलवामा सेक्टरमध्ये १४ फेब्रुवारीला दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात ४०हून अधिक जवान शहीद झाले. याचे पडसाद सर्वत्र उमटले. क्रीडा क्षेत्रातील जाणकार, क्रिकेट संघटना व चाहतेदेखील आपला रोष व्यक्त केला. विविध क्रिकेट संघटनांनी पाकिस्तानी खेळाडूंचे फोटो काढून टाकले. तसेच, ICC World Cup 2019 स्पर्धेत भारताने पाकिस्तानविरुद्धचा सामना खेळू नये, असा सूरही उमटत लागले. पण भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना नियोजित वेळापत्रकाप्रमाणेच होणार, असे स्पष्ट संकेत ICC चे CEO डेव्ह रिचर्डसन यांनी आधीच दिले होते.

भारत पाक सामन्याच्या साशंकतेबाबत त्यांना एका कार्यक्रमात प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना ते म्हणाले होते की नियोजित वेळापत्रकाप्रमाणे सामने होणार नाहीत, अशी सध्या कोणत्याही सामन्याची स्थिती नाही. त्यामुळे विश्वचषक स्पर्धेत सर्व सामने ठरल्याप्रमाणेच होतील. इंग्लंडच्या ओल्ड ट्रॅफोर्ड स्टेडियममध्ये १६ जूनला होणाऱ्या भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यासाठी २५ हजार प्रेक्षकसंख्या असलेले मैदान उपलब्ध आहे. मात्र या सामन्यासाठी तब्बल ४ लाख क्रिकेटप्रेमींचे अर्ज आलेले आहेत, अशी माहिती ICC ने दिली होती. त्यानंतर आता तिकीटविक्री सुरु झाल्यावर अवघ्या ४८ तासांतच तिकिटे हाऊसफुल झाली आहेत.

आतापर्यंत विश्वचषकात एकदाही पाकिस्तान भारताला हरवू शकलेला नाही. २०१५ मध्ये विश्वचषकात भारत आणि पाकिस्तान शेवटचा सामना खेळला होता. त्या सामन्यातही भारताकडून पाकिस्तनाला पराभूत व्हावे लागले होते. दोन्ही देशांमध्ये इतका तणाव असतानाही सामन्याची सगळी तिकीटं विकली गेल्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. याच मैदानावर भारत आणि विंडीज यांच्यात २६ जूनला सामना होणार आहे. या सामन्याच्या तिकीटांची विक्री मात्र खूपच तुरळक प्रमाणात होताना दिसत आहे.