भारतीय क्रिकेट संघासमोरील सर्वात मोठी अडचण म्हणजे चौथ्या क्रमांकावरील फलंदाज. चौथ्या क्रमांकावर नेमका कोणत्या फलंदाजाला खेळवायचा हा प्रश्न भारतीय संघाला नेहमी पडलेला असतो. चौथ्या क्रमांकावर भारताने अनेक फलंदाजांना संधी दिली असून अद्याप पर्यायी खेळाडू सापडलेला नाही. मात्र भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू युवराज सिंह याने ऋषभ पंतच्या निमित्ताने भारतीय संघाची ही अडचण दूर झाली असल्याचं म्हटलं आहे.

युवराज सिंह याने ट्विट करत म्हटलं आहे की, ‘मला वाटतं भविष्यात चौथ्या क्रमांकावर खेळण्यासाठी आपल्याला फलंदाज सापडला आहे. त्याची योग्य तयारी करुन घेतली पाहिजे’.

भारतीय संघ आज बांगलादेशविरोधात मैदानात उतरला असून चौथ्या क्रमांकावर ऋषभ पंतला संधी देण्यात आली. ऋषभ पंतने यावेळी फटकेबाजी करत ४१ चेंडूत ४८ धावा केल्या. विश्वचषक स्पर्धेतील पहिलं अर्धशतक झळकावण्यासाठी दोन धावा त्याला कमी पडल्या. शिखर धवन जखमी झाल्यानंतर त्याच्या जागी विजय शंकरला संघात स्थान देण्यात आलं होतं. पण नेट प्रॅक्टिस दरम्यान विजय शंकरला दुखापत झाल्यानंतर ऋषभ पंतला संघात संधी देण्यात आली आहे. विजय शंकर विश्वचषक स्पर्धेतून बाहेर पडल्याने आता ऋषभ पंतला संधीचं सोनं करण्याची चांगलीच संधी आहे.

WC 2019 : ऋषभ पंत कुठे?; हा घ्या चौथ्या क्रमांकावर – रोहित शर्मा

इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात विजय शंकरच्या जागी ऋषभ पंत याला संधी मिळाली. पण पंत फारशी चांगली कामगिरी करू शकला नाही. कर्णधार कोहली माघारी परतल्यानंतर ऋषभ पंत चौथ्या क्रमांकावर खेळण्यासाठी आला. त्यावेळी भारताला जलद धावा करण्याची गरज होती. पण त्याला ते शक्य झाले नाही. १९ चेंडूत २२ धावा करून तो माघारी परतला. त्यानंतर त्याच्या समावेशावरुन अनेक चर्चा रंगल्या होत्या.

सामन्यानंतर रोहित शर्माने घेतल्लेया पत्रकार परिषदेत त्याला पत्रकारांनी पंतबाबत प्रश्न विचारला. “जेव्हा भारताला फटकेबाजीची गरज होती आणि कर्णधार कोहली बाद झाला. त्यावेळी फॉर्ममध्ये असलेल्या हार्दिक पांड्याच्या जागी ऋषभ पंतला चौथ्या क्रमांकावर अचानक फलंदाजीला आलेला पाहून तुला आश्चर्य वाटलं नाही का?” असा प्रश्न रोहितला विचारण्यात आला. त्यावेळी रोहितने दिलेल्या उत्तराने सगळीकडे हशा पिकला. “मला अजिबात आश्चर्य वाटलं नाही. तुम्हा सगळ्यांना ऋषभ पंत संघात हवा होता, बरोबर ना? तुम्हीच नाही तर सगळ्या भारताला ऋषभ पंत संघात हवा होता. तुम्ही सारखं विचारत होतात की ऋषभ पंत कुठे आहे? .. हा घ्या तो चौथ्या क्रमांकावर आहे”, असे मिश्किल उत्तर रोहितने दिले होते.