विश्वचषक स्पर्धा उत्तरार्धामध्ये आली तरीही टीम इंडियात चौथ्या जागेवर कोण खेळणार यावरुन सुरु असलेलं गुऱ्हाळ काही केल्या संपण्याचं नाव घेत नाहीये. शिखर धवनच्या अनुपस्थितीत विजय शंकरला भारतीय अंतिम संघात स्थान मिळालं, यानंतर चौथ्या क्रमांकावर फलंदाजीचीही संधी मिळाली. मात्र विजय शंकरला अपेक्षेप्रमाणे कामगिरी करता आलेली नाही. अफगाणिस्तान आणि वेस्ट इंडीजविरुद्धच्या सामन्यात भारतीय संघाला प्रतिस्पर्ध्याकडून चांगलीच झुंज मिळाली होती. यानंतर विजय शंकरला संघातून बाहेर काढण्याची मागणी सोशल मीडियावरुन व्हायला लागली.

अवश्य वाचा – World Cup 2019 : विश्वचषकात चौथ्या क्रमांकावर धोनीनेच फलंदाजी करावी – डीन जोन्स

मात्र इंग्लंडचा माजी खेळाडू केविन पिटरसन विजय शंकरच्या मदतीला धावून आला आहे. पिटरसनने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन विराट कोहली आणि रवी शास्त्री यांना विजय शंकरला संघातून काढू नका अशी विनंती केली आहे.

मध्यंतरीच्या काळात विजय शंकर ऐवजी ऋषभ पंतला भारतीय संघात स्थान देण्याची मागणी सुरु होती. मात्र केविन पिटरसनने पंतला संघात घेण्याबद्दल एक महत्वाची सूचना केली आहे. ऋषभला अंतिम संघात जागा मिळण्यासाठी अजून खुप वेळ आहे, तो अद्याप तयार झालेला नाही, असं पिटरसन म्हणाला.

अवश्य वाचा – World Cup 2019 : मोईन अलीला खुणावतेय विराट कोहलीची विकेट

आतापर्यंत झालेल्या पाचही सामन्यात भारतीय संघाने विजय संपादन केला आहे. यानंतर भारतीय संघ रविवारी यजमान इंग्लंडशी दोन हात करणार आहे. बर्मिंगहॅमच्या मैदानावर हा सामना रंगेल.