भारतीय संघाचे माजी कर्णधार सुनिल गावसकर यांनी आगामी विश्वचषक स्पर्धेसाठी चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला लोकेश राहुल योग्य उमेदवार असल्याचं म्हटलं आहे. सध्या सुरु असलेल्या आयपीएलच्या बाराव्या हंगामात राहुल चांगल्याच फॉर्मात आहे. आतापर्यंत झालेल्या सामन्यात राहुलने ३०० पेक्षा जास्त धावा काढल्या आहेत. यामध्ये एक शतक आणि तीन अर्धशतकांचा समावेश आहे.

“चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी कोण येईल हा वादाचा मुद्दा आहे. माझ्या मते संघनिवडीसाठी सध्या सुरु असलेल्या आयपीएलमधला फॉर्म थोड्या प्रमाणात का होईना पण लक्षात घेतला जाईल. गेल्या हंगामात अंबाती रायुडू हा चांगल्या फॉर्मात होता, तेव्हा त्याच्या नावाची चर्चा होती. मात्र त्याची कामगिरी आता ढासळली आहे. त्यामुळे लोकेश राहुलसारख्या फलंदाजाची चौथ्या क्रमांकाच्या फलंदाजीसाठी निवड केली जाऊ शकते. याआधीही त्याने चौथ्या क्रमांकावर फलंदाजी केली आहे.” गावसकर India Today वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.

यावेळी बोलत असताना गावसकरांनी लोकेश राहुलच्या सध्याच्या आयपीएलमधील फलंदाजीचं कौतुक केलं. “सध्याच्या हंगामात तो खूप मेहनतीने आणि संयमाने फलंदाजी करतो आहे. माझ्यामते सलामीच्या फलंदाजाला आपली जागा बदलून मधल्या फळीत फलंदाजीसाठी येण्यामध्ये फार समस्या येणार नाही.”सोमवारी बीसीसीआयची निवड समिती विश्वचषकासाठीच्या संघाची निवड करणार आहे. फलंदाजीत चौथ्या क्रमांकासाठी लोकेश राहुल, केदार जाधव, अंबाती रायुडू, विजय शंकर हे खेळाडू शर्यतीत आहेत. त्यामुळे कोणत्या खेळाडूला अंतिम संघात जागा मिळते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. ३० मे पासून सुरु होणाऱ्या विश्वचषकात भारताचा पहिला सामना ५ जून रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणार आहे.