एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. या प्रतिष्ठेच्या स्पर्धंसाठी सर्व संघातील खेळाडू कसून तयारी करत आहेत. या स्पर्धेसाठी भारतातील संघाने आपले सर्वोत्तम १५ खेळाडू जाहीर केले आहेत. लवकरच भारताचा संघ इंग्लंडमध्ये दाखल होणार आहे. क्रिकेटमधील अनेक जाणकारांनी भारताला विश्वचषक विजेतेपदाची प्रबळ दावेदार सांगितले आहे. पण विंडीजचे महान खेळाडू आणि माजी कर्णधार क्लाईव्ह लॉईड यांनी मात्र इंग्लंडचा संघ विजेतेपदाचा दावेदार असल्याचे म्हंटले आहे.

“आपल्याला अपेक्षित संघ कशी कामगिरी करतात ते आधीच सांगणे कठीण असते. १९९२ साली पाकिस्तान विश्वविजेता होईल किंवा १९९६ साली श्रीलंका विजेतेपद पटकावले हे कोणालाही वाटले नव्हते. पण यावेळी मात्र मला असे वाटते की इंग्लंडचा संघ विश्वचषक विजेतेपदाचा प्रबळ दावेदार आहे. त्याचा संघ गेल्या काही काळात उत्तम कामगिरी करत आहे. त्यांचा संघ समतोल आहे. या संघाकडून चाहत्यांना खूप अपेक्षा आहेत.त्यामुळे इंग्लंडला या विश्वचषक स्पर्धेत पराभूत करणे खूप अवघड जाणार आहे”, असे लॉईड म्हणाले.

“यंदाच्या विश्वचषक स्पर्धेत इंग्लंडच्या संघाप्रमाणे विंडीजचा संघदेखील चांगली कामगिरी करेल अशी मला आशा आहे. विंडीज क्रिकेट बोर्ड आणि संघ व्यवस्थापन यांनी यंदाच्या विश्वचषकासाठी महत्वाच्या खेळाडूंना संघात स्थान देण्यात आले आहे. हे खेळाडू मिळालेल्या संधीचं सोनं करतील आणि उत्तम कामगिरी करतील.” असे लॉईड यांनी सांगितले.

दरम्यान, भारताचा १५ खेळाडूंचा संघ लवकरच इंग्लंडमध्ये दाखल होणार आहे. भारताच्या संघात विश्वचषकासाठी विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखर धवन, लोकेश राहुल, महेंद्रसिंग धोनी (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, विजय शंकर, केदार जाधव, मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, दिनेश कार्तिक (राखीव यष्टीरक्षक), जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जाडेजा यांना संधी देण्यात आली आहे.