२०१९ विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाने आतापर्यंच ५ सामने जिंकत आपली विजयी घौडदौड कायम ठेवली आहे. रविवारी भारतासमोर यजमान इंग्लंडचं आव्हान असणार आहे. बर्मिंगहॅमच्या मैदानावर दोन्ही संघ एकमेकांसमोर भिडतील. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली सध्या चांगल्या फॉर्मात आहे. सलग ४ सामन्यांमध्ये विराट कोहलीने अर्धशतकी खेळी केली आहे. मात्र इंग्लंडविरुद्ध सामन्यात विराटपुढे एक वेगळं आव्हान असणार आहे. आयपीएलमध्ये विराटच्या रॉयल चॅलेंजर्स संघाकडून खेळणारा मोईन अली, त्याची विकेट घेण्यासाठी उत्सुक आहे.

“विराट भारतासाठी अधिकाधीक धावा काढण्याच्या हेतूने मैदानावर उतरेल यात काही शंका नाही. मी देखील त्याची विकेट घेण्यासाठी उत्सुक आहे. विराटसारख्या महान खेळाडूची विकेट मिळवणं ही माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे.” द गार्डियन वृत्तपत्रासाठी लिहीलेल्या कॉलममध्ये मोईन अलीने विराटला आव्हान दिलं आहे. याचसोबत बर्मिंगहॅमच्या सामन्यात भारतीय संघावर जास्त दबाव असेल असंही अली म्हणाला.

गुणतालिकेत सध्या इंग्लंडचा संघ ८ गुणांनिशी चौथ्या स्थानावर आहे. इंग्लंडसमोर आता भारत आणि न्यूझीलंड या दोन संघाचं आव्हान असणार आहे. या दोन सामन्यांपैकी एकाही सामन्यात इंग्लंडचा पराभव झाला तर त्यांचं उपांत्य फेरीतलं स्थान धोक्यात येणार आहे. त्यामुळे भारतीय संघासमोर रविवारच्या सामन्यात इंग्लंडचा कस लागेल यात शंका नाही.