२०१९ ची विश्वचषक स्पर्धा भारतीय संघाचा यष्टीरक्षक महेंद्रसिंह धोनीसाठी म्हणावी तितकी चांगली जात नाहीये. गेल्या काही सामन्यांमध्ये धोनी आपल्या संथ फलंदाजीमुळे सोशल मीडियावर टीकेचा धनी बनला आहे. अनेक चाहत्यांनी धोनीने विश्वचषकानंतर निवृत्ती स्विकारावी असं म्हटलं होतं. मात्र श्रीलंकेचा जलदगती गोलंदाजी लसिथ मलिंगाच्या मते धोनीने, पुढील किमान १ ते २ वर्ष क्रिकेट खेळत रहावं.

“माझ्या मते धोनीने पुढचं १ ते २ वर्ष क्रिकेट खेळत रहावं. गेल्या १० वर्षांमध्ये मी त्याच्यासारखा सर्वोत्तम फिनीशर खेळाडू बघितलेला नाही. भविष्यकाळात कोणताही खेळाडू त्याला मात देऊ शकले असं मला वाटत नाही. धोनीने आपला हा अनुभव नवीन खेळाडूंपर्यंत पोहचवायला हवा. धोनीसारख्या खेळाडूमुळेच भारतीय संघ आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आताच्या घडीला सर्वोत्तम संघ आहे. कोणत्याही संघाला कोणत्याही स्पर्धेत हरवण्याती ताकद भारतीय संघामध्ये आहे.” मलिंगा ANI वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत बोलत होता.

विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाने उपांत्य फेरीतलं आपलं स्थान पक्क केलं आहे. साखळी फेरीत भारताचा अखेरचा सामना श्रीलंकेविरुद्ध होणं बाकी आहे. त्यामुळे या सामन्यात भारतीय संघ कशी कामगिरी करतो, आणि धोनीला आपला जुना सूर पुन्हा एकदा सापडतो का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

अवश्य वाचा – धोनीला बळीचा बकरा बनवण्याचं काम सुरु आहे !