२०१९ विश्वचषक स्पर्धा उत्तरार्धामध्ये खऱ्या अर्थाने रंगतदार होत चालली आहे. ऑस्ट्रेलियाचा अपवाद वगळता अद्याप एकही संघ उपांत्य फेरीत दाखल होऊ शकला नाहीये. न्यूझीलंडच्या संघाला पाकिस्तानविरुद्ध पराभव स्विकारावा लागल्यामुळे त्यांचं उपांत्य फेरीतील प्रवेशाचं गणित बिघडलं. न्यूझीलंडचे साखळी फेरीत आता २ सामने उरले असून त्यांना शनिवारी ऑस्ट्रेलिया आणि त्यानंतर यजमान इंग्लंडचा सामना करायचा आहे. उपांत्य फेरी गाठण्यासाठी न्यूझीलंडला अवघ्या एका विजयाची गरज आहे. मात्र ऑस्ट्रेलियाचा संघ न्यूझीलंडला सहजासहजी हा विजय मिळवू देणार नाहीये. न्यूझीलंडविरुद्ध सामन्यासाठी ऑस्ट्रेलियाने तश्या पद्धतीने रणनिती आखलेली आहे.

ऑस्ट्रेलियाचे गोलंदाज यंदाच्या स्पर्धेत चांगल्या फॉर्मात आहे. मिचेल स्टार्क आणि पॅट कमिन्स यांनी प्रतिस्पर्धी फलंदाजांना चांगलच पेचात पाडलं होतं. मात्र न्यूझीलंडविरुद्ध सामन्यात ऑस्ट्रेलियाचा संघ आपल्या प्रमुख गोलंदाजांना विश्रांती देण्याच्या मनस्थितीमध्ये नाहीये. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार अरॉन फिंचने यासंदर्भातले संकेत दिले आहेत. मिचेल स्टार्कने आतापर्यंत १९ बळी घेत, स्पर्धेत सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज म्हणून पहिलं स्थान पटकावलं आहे. “तुमच्या संघाचं विजयाचं समिकरण पक्क ठरलेलं असताना एका कारणासाठी ते बिघडवणं योग्य वाटत नाही.” कर्णधार फिंच सामन्याआधी पत्रकारांशी बोलत होता.

दुसरीकडे न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन, ऑस्ट्रेलियाविरुद्ध सामन्यासाठी सज्ज झाला आहे. ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नरला बाद करणं हे आमच्या संघासमोरचं पहिलं उद्दीष्ट असल्याचं विल्यमसन म्हणाला. “वॉर्नर महान खेळाडू आहे, ऑस्ट्रेलियाला उपांत्य फेरीमध्ये पोहचवण्यात त्याचा मोलाचा वाटा आहे. त्यामुळे आम्हाला त्याची चिंता आहे, तो फार मोठी खेळी करणार नाही याची आम्ही काळजी घेऊ.” विल्यमसन आपल्या संघाच्या रणनितीविषयी बोलत होता. दोन्ही संघ सध्या फलंदाजी आणि गोलंदाजीमध्ये चांगल्या फॉर्मात आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियाचं आव्हान पार करुन न्यूझीलंड उपांत्य फेरीत प्रवेश करतो का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.