इंग्लंडमध्ये होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेला अवघे काही दिवस शिल्लक आहेत. प्रत्येक संघाला आधी जाहीर केलेल्या संघात कोणतीही परवानगी न घेता २३ मे पर्यंत बदल करण्याची मुभा देण्यात आली आहे. त्यानुसार पाकिस्तानच्या संघाने २० मे रोजी आपल्या प्राथमिक संघात महत्वाचे बदल केले आणि अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिर, वहाब रियाझ आणि फलंदाज असिफ अली यांना संधी दिली. त्यांच्या जागी जुनेद खान, फहीम अश्रफ आणि अबिद अली यांना संघाबाहेर करण्यात आले आहे.

या निर्णयानंतर पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज जुनेद खान याने अनोख्या पद्धतीने या गोष्टीचा निषेध केला. त्याने तोंडावर काळी पट्टी बांधलेला फोटो ट्विट केला आणि “अंतिम संघातून मला वगळण्याच्या निर्णयावर मला काहीही बोलायचे नाही. सत्य हे नेहमी कटू असते”, असे ट्विट करत त्याने निषेध व्यक्त केला होता.

जुनेद खानचे ट्विट

 

मात्र काही वेळाने त्याने ते ट्विट डिलीट केले. पाकिस्तनाच्या प्राथमिक संघाची घोषणा आधी झाली होती. त्यात जुनेद खानचा समावेश होता.

पण पाकिस्तानचा संघ इंग्लंडमध्ये एकदिवसीय मालिका खेळला. या मालिकेत पाकिस्तानने अत्यंत खराब कामगिरी केली. त्याच्या गोलंदाजांना सरासरी ३०० हून अधिक धावा चोपण्यात आल्या. त्यामुळे मालिका गमावल्यानंतर पाकिस्तनाच्या संघाने २० मे रोजी संघात ३ महत्वाचे बदल करत त्यात २ अनुभवी वेगवान गोलंदाजांचे पुनरागमन घडवून आणले.

मोहम्मद आमिर आणि असिफ अली हे दोघे इंग्लंडविरुद्ध झालेल्या एकदिवसीय सामन्यात पाकिस्तानच्या संघात होते. मोहम्मद आमिर एक सामना खेळला पण त्यानंतर तो कांजिण्यांमुळे मालिकेतून बाहेर झाला. आता तो पूर्णपणे तंदुरुस्त झाला आहे. असिफने मिळालेल्या संधीचे सोने केले. त्याने ४ डावात २ अर्धशतके झळकावली आणि आपली जागा पक्की केली.

या संघात धक्कादायक निर्णय ठरला तो वहाब रियाझचा समावेश. २०१७ मध्ये झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सामन्यानंतर वहाब एकही सामना खेळला नाही. तसेच त्याने ऑक्टोबर २०१८ नंतर एकही कसोटी सामना खेळलेला नाही. तरीदेखील पाकिस्तान क्रिकेट मंडळाने विश्वास ठेवून वहाबला संधी दिली आहे.