पाकिस्तान संघाला विश्वचषक स्पर्धेत अंतिम चारमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी शुक्रवारी बांगलादेशविरुद्ध अशक्यप्राय विजय मिळवावा लागणार आहे. मात्र, पाकिस्तानच्या आजी-माजी खेळाडूंनी अद्याप अशा सोडलेली दिसत नाही. सामन्याच्या पूर्वसंध्येला बोलताना सरफराजने ५०० धावा करू आणि बांगलादेशला ५० धावांवर बाद करू असा अतिविश्वास व्यक्त केला आहे. तर माजी कर्णधार मोहम्मद युसूफने वादग्रस्त वक्तव्य करत क्रीडा विश्वाचे लक्ष वेधलं आहे. ‘देव करो आणि बांगलादेश संघावर वीज पडो,’ असे वक्तव्य युसूफने केले आहे. या वादग्रस्त वक्तव्यानंतर युसूफवर चोहोबाजूंनी टीका होत आहे. नेटकऱ्यांनी त्यांच्यावर टीकेची झोड सोडली आहे.

उपांत्य फेरीत प्रवेश मिळण्यासाठी पाकिस्तान संघाला एखादी नैसर्गिक आपत्तीच वाचवू शकते, असे वक्तव्य मोहम्मद युसूफने केले आहे. तो म्हणाला,’ पाकिस्तानचा संघ विश्वचषक स्पर्धेबाहेर गेला हे जवळजवळ निश्चित झाले आहे. पण सामना सुरू असताना मैदानावर नैसर्गिक आपत्ती येवो किंवा वीज पडून प्रतिस्पर्धी खेळाडू अनफिट व्हावा. तरच आणि फक्त तरच पाक संघ उपांत्य फेरीत प्रवेश करू शकेल.’ मोहम्मद युसूफच्या या वादग्रस्त वक्तव्यानंतर पाकिस्तान आणि पूर्ण क्रीडा विश्वातून नाराजी व्यक्त केली जात आहे.

१४ गुणांसह गुणतालिकेत ऑस्ट्रेलियाचा संघ अव्वल स्थानावर आहे. त्यापाठोपाठ भारत(१३), इंग्लंड(१२), न्यूझीलंड(११) आणि पाकिस्तान (९) आहेत. पाकिस्तान संघाचा एक सामना अद्याप बाकी आहे. मात्र, संघाचा नेटरनरेट अतिशय खराब असल्यामुळे उपांत्य फेरीत प्रवेश करण्यासाठी त्यांना अशक्यप्राय विजय मिळवणे गरजेचं आहे.

इंग्लंडने अखेरच्या दोन सामन्यांत भारत आणि न्यूझीलंडला हरवत आपले उपांत्य फेरीचे स्थान निश्चित केले. त्यामुळे पाकिस्तानच्या उरल्यासुरल्या आशा जवळपास संपुष्टात आल्या. चौथ्या क्रमांकावरील न्यूझीलंडचे नऊ सामन्यांत ११ गुण झाले आहेत. पाकिस्तान नऊ गुणांनीशी पाचव्या क्रमांकावर असून सरासरीमध्ये न्यूझीलंडला मागे टाकण्यासाठी पाकिस्तानला मोठय़ा फरकासह विजय मिळवावा लागणार आहे. मात्र त्यासाठी सरफराज अहमदच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान संघाला आता गणितीय रचनेनुसार प्रथम नाणेफेक जिंकावी लागेल आणि फलंदाजी स्वीकारावी लागेल. प्रथम फलंदाजी करताना ३५० पेक्षा अधिक धावा फटकावल्यास, पाकिस्तानला बांगलादेशवर ३११ धावांनी विजय मिळवावा लागेल किंवा ४००पेक्षा अधिक धावा उभारल्यास, त्यांना ३१६ धावांनी विजयाची नोंद करावी लागेल. मात्र बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारल्यास, पाकिस्तानचे आव्हान लगेच संपुष्टात येईल.