विश्वचषक स्पर्धेचा महासंग्रामात आता चुरस वाढली आहे. उपांत्य फेरीतील संघ कोणते असतील याचा अदांज बांधला जाऊ लागला आहे. पण, सध्या फक्त ऑस्ट्रेलियाने १२ गुणांसह उपांत्य फेरीतील आपले स्थान पक्के केले आहे. इतर संघाला अद्याप प्रतीक्षा करावी लागणार आहे. भारताचे अद्याप तीन सामने बाकी आहेत. भारत पाच विजयासह ११ गुण घेत दुसऱ्या स्थानावर आहे. उपांत्य फेरीत पोहचण्यासाठी भारताला फक्त एक विजय आवश्यक आहे. मात्र, बाकी दोन जागांसाठी चार संघ शर्यतीत आहेत. यामध्ये यजमान इंग्लंड, न्यूझीलंड, बांग्लादेश, आणि पाकिस्तान यांचा समावेश आहे. दक्षिण आफ्रिकेविरोधात पराभवामुळे श्रीलंकेचे आव्हान खडतर झाले आहे.

यजमान इंग्लंड संघ आठ गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. इंग्लंड संघाचे अद्याप दोन सामने बाकी आहेत. त्यापैकी रविवारी भारताविरोधात एक सामना असेल तर दुसरा सामना न्यूझीलंड विरोधात आहे. विश्वचषकाचा इतिहास पाहता गेल्या २७ वर्षात दोन्ही संघाला इंग्लंडला पराभूत करता आलेले नाही. त्यामुळे दबावाच्या सामन्यात इतिहास बाजी मारणार की इंग्लंड उपांत्य फेरीत आपले स्थान पक्के करणार. इंग्लंड संघाचा एक पराभव पाकिस्तानच्या पथ्यावर पडू शकतो. जर इंग्लंड संघाला एक परभावाचा झटका बसला आणि पाकिस्तान संघाने दोन्ही सामने जिंकले तर पाकिस्तान उपांत्य फेरीत धडक मारेल. पाकिस्तानचे उर्वरित दोन सामने बांग्लादेश आणि अफगाणिस्तान विरोधात आहे. त्यामुळे इंग्लंडच्या तुलनेत पाकिस्तान संघासमोर सोपं आव्हान असणार आहे. पाकिस्तानचा संघ सात सामन्यात सात गुणांसह सहाव्या स्थानावर आहे. रविवारी भारत आणि इंग्लंडच्या सामन्यांमध्ये पाकिस्तानचे चाहते भारतीय संघाला पाठींबा देण्यामागील हेही एक कारण आहे.

भारताकडून झालेला पराभवानंतर प्रतिष्ठा व बाद फेरीचे आव्हान राखण्याचे ध्येय डोळ्यासमोर ठेवीत पाकिस्तानने या स्पर्धेत जोरदार कमबॅक केले आहे. दक्षिण आफ्रिका व न्यूझीलंड या दोन बलाढ्य संघांना पराभूत करणाऱ्या पाकिस्तानचे पुढचे ‘लक्ष्य’ अफगाणिस्तानवर मात करण्याचे असणार आहे. भारताविरुद्ध विजयाच्या उंबरठ्यावरून पराभव पत्करणारा अफगाणिस्तानचा संघ आज त्यांना चिवट झुंज देईल अशी अपेक्षा आहे. न्यूझीलंडवरील दणदणीत विजयामुळे पाकिस्तानचा आत्मविश्‍वास आणखी वाढला आहे. गेल्या दोन सामन्यांमध्ये त्यांच्या खेळाडूंनी सकारात्मक खेळ केला आहे.

पाकिस्तानसारखीच परिस्थिती बांग्लादेशचीही आहे. उपांत्य फेरीत पोहचण्यासाठी बांग्लादेशलाही दोन विजय अनिवार्य आहेत. त्यांचे दोन्ही सामने शेजऱ्याविरोधात आहेत. भारत आणि पाकिस्तान. बांग्लादेशच्या दृष्टीने आज पाकिस्तानचा आणि उद्या इंग्लंडचा पराभव व्हायला हवा. त्यानंतर बांग्लादेशला भारत आणि पाकिस्तानवर मात करून उपांत्य फेरीत पोहचता येईल.

न्यूझीलंड संघाचा विचार करता सात सामन्यात ११ गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. उपांत्य फेरीत पोहचण्यासाठी न्यूझीलंडला फक्त एक गुणाची गरज आहे. न्यूझीलंडचे दोन्ही सामने तगड्या संघाबरोबर आहेत. ऑस्ट्रलिया आणि इंग्लंज यांच्याबरोबर न्यूझीलंडचे दोन्ही सामने बाकी आहेत. त्यामुळे दोन्ही सामन्यात न्यूझीलंडचा पराभव झाला तर त्यांचा उपांत्य फेरीतील प्रवेश नेट रनरेटवर अवलंबून आहे.