टीम इंडियाने विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्यफेरीत प्रवेश केला असला तरी चौथा क्रमांक आणि मधल्या फळीचा प्रश्न कायम आहे. या वर्ल्डकपमध्ये मधली फळी सातत्याने अपयशी ठरत आहे. या पार्श्वभूमीवर ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकल क्लार्कने भारतीय संघाला एक सल्ला दिला आहे. ऋषभ पंतकडे मोठे फटके खेळण्याची क्षमता आहे. त्यामुळे आगामी सामन्यांमध्ये त्यांचा चौथा क्रमांक बदलू नका असे क्लार्कने म्हटले आहे.

दुखापतग्रस्त शिखर धवनच्या जागी ऋषभ पंतचा भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे. धवन बाहेर गेल्यामुळे पंतला संधी मिळाली. ऋषभ पंतला आतापर्यंत दोन सामन्यात संधी मिळाली असून त्याने सुद्धा निराश केलेले नाही. इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात त्याने ३२ तर बांगलादेश विरुद्ध ४८ धावांची खेळी केली. पंतने दोन्ही सामन्यांमध्ये चौथ्या क्रमांकावर येऊन फलंदाजी केली. त्या क्रमांकावर आधी विजय शंकर खेळत होता. दुखापतीमुळे विजय शंकरला सुद्धा वर्ल्डकपमधून बाहेर पडावे लागले आहे.

ऋषभ पंतमुळे भारतीय संघाला एक चांगला पर्याय मिळाला आहे. त्यांच्याकडे मोठे फटके खेळण्याची क्षमता आहे. ज्याचा भारतीय संघाला फायदा होईल असे मायकल क्लार्क म्हणाला. सहाव्या क्रमांकावर दिनेश कार्तिकला पाठवण्याच्या निर्णयाचे सुद्धा क्लार्कने समर्थन केले. क्लार्कच्या मते अनुभवी कार्तिककडे सुद्धा हार्दिक पांडयासारखी फलंदाजीची क्षमता आहे. दिनेश कार्तिक दुसरा हार्दिक पांडया आहे. त्याच्यामध्ये पहिला चेंडू सीमारेषेपार पाठवण्याची क्षमता आहे. त्यामुळे क्लार्कच्या मते कार्तिकसाठी सहावा क्रमांक योग्य आहे.