World Cup 2019 SA vs WI : दक्षिण आफ्रिका आणि विंडीज यांच्यातील सामना पावसामुळे अखेर रद्द करण्यात आला. पहिल्या तीनही सामन्यात पराभव पत्कराव्या लागलेल्या आफ्रिकेसाठी हा सामना अत्यंत महत्वाचा होता. पण पाऊस न थांबल्याने सामना रद्द करण्यात आला आणि दोनही संघांना १ – १ गुण देण्यात आला. सामना रद्द झाल्याने आफ्रिकेचा संघ गुणतालिकेत नवव्या स्थानी फेकला गेला. तर विंडीजच्या संघाला पाचव्या स्थानी समाधान मानावे लागले आहे.

दुखापतीमुळे डेल स्टेनने घेतलेली माघार, प्रमुख वेगवान गोलंदाज लुंगी एन्गिडी अद्यापही जायबंदी आणि सलगच्या तीन पराभवांमुळे दक्षिण आफ्रिकेचे यंदाच्या विश्वचषकातील आव्हान डळमळीत झाले होते. पहिल्यावहिल्या विजयासाठी दक्षिण आफ्रिकेचा संघ सोमवारी साऊदम्पटनच्या रोज बाऊल स्टेडियमवर विंडीजविरुद्ध उतरला. सामन्यात आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करत खराब सुरुवात केली होती. त्यांनी २९ धावांत २ गडी गमावले होते. पण त्यानंतर आलेल्या पावसाने आफ्रिकेच्या पुढील फेरीत जाण्याच्या अपेक्षांवर जवळपास पाणी फेरले.

दुसरीकडे, वेस्ट इंडिजने आतापर्यंत या स्पर्धेत संमिश्र कामगिरी केली आहे. आपल्या वेगवान माऱ्यासमोर पाकिस्तानला अवघ्या १०५ धावांवर गुंडाळत वेस्ट इंडिजने सहज विजय मिळवला होता. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यातही वेस्ट इंडिजच्या वेगवान गोलंदाजांनी चमक दाखवली होती. मात्र विजयाच्या स्थितीत असतानाही अखेरच्या क्षणी फलंदाजांनी केलेल्या खराब कामगिरीमुळे त्यांना ऑस्ट्रेलियाकडून पराभूत व्हावे लागले होते. वेस्ट इंडिजच्या या गोलंदाजीची तुलना ८०च्या दशकातील वेगवान माऱ्याशी केली जात आहे. तसेच दक्षिण आफ्रिकेची वेगवान गोलंदाजी कमकुवत झाली असून वेस्ट इंडिजच्या आक्रमक फलंदाजांसमोर त्यांची कसोटी लागणार हे निश्चित होते. पण पावसामुळे सामना रद्द करून दोघांना १-१ गुण देण्यात आले.