World Cup २०१९ स्पर्धा ३० मे पासून सुरु होणार आहे. या स्पर्धेत १६ जूनला भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होणार आहे. मात्र पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ भारताने पाकिस्तानशी सामना खेळू नये, असा सूर सर्वत्र उमटू लागला आहे. मात्र सामना रद्द करून पाकिस्तानला फुकटचे २ गुण का द्यायचे? असा सवाल मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने उपस्थित केला आहे.

सामन्यावर बहिष्कार टाकून पाकिस्तानला फुटकचे २ गुण का द्यायचे? असा सवाल सचिन तेंडुलकर याने केला आहे. भारताने पाकिस्तानवरील वर्चस्व कायम राखायला हवे. त्यामुळे विश्वचषकात भारताने पाकिस्तानला पराभूत करावे आणि आपली ऐतिहासिक विजयी घोडदौड सुरूच ठेवावी, असे मत सचिनने व्यक्त केले आहे. पुलवामा हल्ल्याच्या दिवशीही सचिनने या हल्ल्याचा तीव्र निषेध केला होता. हा हल्ला अत्यंत भ्याड स्वरूपाचा हल्ला आहे.

दरम्यान, पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यात भारताचे ४० हून अधिक जवान शहीद झाले. त्यानंतर भारतातील राज्य क्रिकेट संघटनांनी पाकिस्तानी क्रिकेटपटूचे फोटो आपल्या स्टेडियममधून आणि मुख्यालयात हटवले. तसेच त्यानंतर अनेक क्रिकेट जाणकारांनी आणि दिग्गज क्रिकेटपटूंनी हा सामना रद्द करण्याची मागणी केली होती.