भारताविरुद्ध पहिल्याच चेंडूवर भोपळाही न फोडता बाद होणाऱ्या अष्टपैलू खेळाडू शोएब मलिक याच्यावर पाकिस्तानमधून टीका होत आहे. त्यात भर म्हणून सामन्याच्या आदल्या रात्रीचा हुक्का पार्टीचा व्हिडीओ व्हायरल होतोय. त्यामुळे प्रसारमाध्यमांसह चाहत्यांनी शोएब मलिक आणि संघावर टीकास्त्र सोडलं आहे. शोएबने आता क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारावी असाही सूर पाकच्या क्रिकेट चाहत्यांनी आवळला आहे.

पाकिस्तानी संघाचा हुक्का पार्टीमधील एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. त्यावर संतापलेल्या चाहत्यांनी हा व्हिडीओ भारतीय संघाविरुद्धाच्या सामन्याच्या आदल्या रात्रीचा असल्याचे म्हटले होते. यात भर म्हणून पाक मिडीयानंही ते फुटेज चालवलं होते. शोएब मलिकवर कडाडून टीका केली होती. हा व्हिडीओ सामन्याच्या आदल्या रात्रीचा नसून १३ जून रोजीचा असल्याचे स्पष्टीकरण शोएब मलिकने ट्विटरवरून दिले आहे. तसेच सानिया आणि त्याला ट्रोल करण्याऱ्या नेटीझन्सलाही शोएबनं खडसावलं आहे.

सोशल मीडियावर ट्रोल झाल्यानंतर मलिकनं पाकिस्तानी प्रसारमाध्यमांच्या विश्वासहर्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे. तो म्हणतो की, ‘ गेल्या २० वर्षांपेक्षा आधिक काळ मी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळताना देशाची सेवा केली. तरीही मला माझ्या वैयक्तिक आयुष्याबद्दल स्पष्टीकरण द्यावं लागतेय हे खरच दुख:द आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडीओ १३ जून रोजीचा आहे. मात्र, सोशल मीडियावर असा दावा केला जातोय की हा व्हिडीओ १५ जून रोजीच्या रात्रीचा आहे. ‘

अन्य एका ट्विटमध्ये शोएबनं ट्रोल करताना कुटुंबातील कोणालाही ओढू नये अशी विनंती केली आहे. सर्व खेळाडूकडून प्रसारमाध्यमांना आणि लोकांना विनंती करतो की, आमच्या कुटुंबाचा सन्मान ठेवा त्यांना आदर द्या.  अशा दर्जाहीन चर्चेमध्ये त्यांना सहभागी करू नका. सोशल मीडियावर शोएब मलिक आणि त्याची पत्नी सानिया मिर्जाला नेटीझन्सनी ट्रोल केलं होते.

सानियानं काही ट्रोलर्सना आपल्या खास शैलीमध्ये प्रतित्तर दिले आहे. आमच्यासोबत एक लहान मुलगा असताना, आमच्या खासगी क्षणांचा व्हिडिओ शूट केला. त्यासाठी आमची परवानगीदेखील घेतली नाही आणि तुम्हाला अडवल्यानंतर तुम्ही असा अपप्रचार करायला लागलात? असा प्रश्न सानियानं ट्विटरवर उपस्थित केला आहे.