27 February 2021

News Flash

भारत धावचीत!

न्यूझीलंडकडून पराभवामुळे विश्वचषकातील आव्हान संपुष्टात

(संग्रहित छायाचित्र)

ओल्ड ट्रॅफर्डच्या रणभूमीवर पाऊस विरामासह साडेअठ्ठावीस तास आशा-आकांक्षा जिवंत राखल्यानंतर भारत विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतून बाद झाला.

गेले एकेचाळीस दिवस विश्वचषकाच्या वातावरणात क्रिकेटमय झालेल्या देशवासीयांचा जीव बुधवारी महेंद्रसिंह धोनी आणि रवींद्र जडेजा खेळपट्टीवर शतकी भागीदारीसह टिकून असेपर्यंत टांगलेला होता.  ६ बाद ९२ अशा कठीण स्थितीतून जडेजा आणि धोनी यांची विजयाकडे वाटचाल सुरू होती. मात्र जडेजा झेलबाद झाल्यानंतर ती थांबली. तर निर्णायक क्षणी धोनी मार्टिन गप्टिलच्या थेट फेकीमुळे धावचीत झाला आणि भारताचे विश्वविजेतेपदाचे स्वप्न उद्ध्वस्त झाले. दोन दिवसांची ही हातघाईची लढाई १८ धावांनी गमावल्यामुळे देशभरात निराशा पसरली.

न्यूझीलंडविरुद्धचा उपांत्य फेरीचा सामना भारत आरामात जिंकून अंतिम फेरी गाठेल, या क्रिकेटरसिकांच्या अपेक्षा फोल ठरल्या. मंगळवारी पावसामुळे अर्धवट राहिलेला उर्वरित सामना बुधवारी नियोजित वेळेत पुन्हा सुरू झाला. न्यूझीलंडने भारतापुढे ५० षटकांत २४० धावांचे आव्हान ठेवले होते. हे आव्हान पेलताना रोहित शर्मा (१), विराट कोहली (१) आणि लोकेश राहुल (१) यांनी हाराकिरी पत्करल्यामुळे भारताची ३ बाद ५ धावा अशी दयनीय अवस्था झाली. परंतु महत्त्वाचे फलंदाज माघारी परतल्यानंतर जडेजाने हिमतीने किल्ला लढवला आणि ७७ धावांची महत्त्वपूर्ण खेळी उभारत भारताला विजयाचे स्वप्न दाखवले. त्याला अनुभवी धोनीने सुरेख साथ दिली.

परंतु भारताला १३ चेंडूंत ३३ धावा हव्या असताना जडेजा बाद झाला. मग ४९व्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर दुहेरी धाव घेण्याच्या प्रयत्नात धोनी बाद झाला आणि मग तळाच्या फलंदाजांना विजयाचे लक्ष्य पेलण्यात अपयश आले.

धोनी धावचीत झाला अन् सामना निसटला..

भारताने पहिल्या दिवसावर वर्चस्व निर्माण केले होते. परंतु न्यूझीलंडच्या गोलंदाजांना या यशाचे श्रेय द्यायला हवे. रवींद्र जडेजाने सामना वाचवण्यासाठी झुंजार प्रयत्न केले. महेंद्रसिंह धोनीसह त्याने महत्त्वाची भागीदारी केली. परंतु धोनी धावचीत झाला आणि सामना आपल्या हातून निसटला. ४५ मिनिटांच्या वाईट खेळाने आपण स्पर्धेबाहेर गेलो. फलंदाज चुकीचे फटके खेळून बाद झाले. परंतु संपूर्ण स्पर्धेत भारताने दर्जेदार खेळाचे प्रदर्शन केले.

– विराट कोहली कर्णधार

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 11, 2019 12:17 pm

Web Title: world cup 2019 semi final india loss the match abn 97
Next Stories
1 .. म्हणून भारताचा पराभव झाला!
2 मोठ्या सामन्यात रनमशीन विराट ठरतोय अपयशी, पाहा आकडेवारी
3 ‘नेहमी कोहली, रोहित आणि धोनीवर अवलंबून राहून चालणार नाही’, सचिन संतापला
Just Now!
X