सलामीवीर शिखर धवनला झालेल्या दुखापतीमुळे भारतीय संघाचा चांगलाच धक्का बसला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध सामन्यात शिखर धवनने शतकी खेळी करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. मात्र पॅट कमिन्सच्या गोलंदाजीवर एक उसळता चेंडू शिखर धवनच्या अंगठ्यावर आदळला, यात जायबंदी झालेला शिखर धवन किमान १०-१२ दिवसांसाठी संघाबाहेर गेला आहे. न्यूझीलंडविरुद्ध सामन्यासाठी भारतीय संघाने लोकेश राहुलला सलामीसाठी बोलवंल होतं. मात्र पावसाने आणलेल्या व्यत्ययामुळे हा सामना होऊच शकला नाही.

मात्र या परिस्थितीमध्येही भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली शिखर धवनजच्या तब्येतीबद्दल आशावादी आहे. शिखर सध्या दुखापतीमधून सावरत असून येत्या १०-१२ दिवसात तो पुनरागमन करेल असं विराटने म्हटलं आहे. ESPNCricinfo या संकेतस्थळाने ही माहिती दिली आहे. “त्याच्या अंगठ्याला प्लास्टर करण्यात आले आहे आणि पुढीत काही दिवस ते तसेच ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर त्याच्या दुखापतीची चिकित्सा करण्यात येईल. आशा करतो की तो साखळी फेरीच्या मध्यंतराच्या सत्रात पुनरागमन करेल आणि उपांत्य फेरीचा सामनाही खेळेल.”

भारतीय संघाचे क्षेत्ररक्षक प्रशिक्षक आर.श्रीधर यांनीही, शिखर धवनच्या दुखापतीबद्दल माहिती दिली आहे. तसेच शिखर धवनही स्वतःला फिट ठेवण्यासाठी जिममध्ये कसून मेहनत घेतो आहे. आपला एक छोटासा व्हिडीओ शिखर धवनने फेसबूक अकाऊंटवर शेअर केला आहे.

न्यूझीलंडविरुद्धचा सामना पावसामुळे वाया गेल्यानंतर भारतीय संघासमोर रविवारी पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचं आव्हान असणार आहे.