‘आयसीसी’ विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या या १२व्या पर्वात जगातील अव्वल १० देश जगज्जेतेपदावर आपली नाममुद्रा कोरण्यासाठी एकमेकांशी निकराने झुंजत आहेत. अफगाणिस्ताननंतर यंदाच्या विश्वचषकातील दक्षिण आफ्रिका संघाचेही आव्हान संपुष्टात आले आहे. न्यूझीलंडविरोधातील पराभवानंतर दक्षिण आफ्रिकेच्या उरल्या सुरल्या आशा संपुष्टात आल्या आहेत. केन विल्यमसनच्या नाबाद शतकाच्या बळावर बुधवारी न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला.

यंदाच्या विश्वचषकांमध्ये दक्षिण आफ्रिकेची कामगिरी खराब झाली आहे. सहा सामन्यापैकी फक्त एका सामन्यात दक्षिण आफ्रिकेला विजय मिळवता आला आहे. तर चार सामन्यात पराभवाचे तोंड पहावे लागले आहे. एक सामना पावसामुळे अनिर्णित सुटला आहे. दक्षिण आफ्रिकेला फक्त दुबळ्या अफगाणिस्तान संघावर विजय मिळवता आलेला आहे. सहा सामन्यानंतर दक्षिण आफ्रिका संघाच्या नावावर फक्त तीन गुण आहेत. गुणतालिकेत दक्षिण आफ्रिकेचा संघ आठव्या स्थानावर विराजमान आहे.

(आणखी वाच : ‘या’ संघाचे विश्वचषक स्पर्धेतील संपले आव्हान)

यंदाची विश्वचषक स्पर्धा राऊंड रॉबिन पद्धतीने खेळवली जात आहे. या स्पर्धेत १० संघांनी भाग घेतला आहे. पहिल्या फेरीत प्रत्येक संघाला अन्य संघाबरोबर खेळत आहे. त्यामुळे प्रत्येकाचे ९ सामने होणार आहेत. सहा सामन्यात चार पराभव आणि ३ गुणांसह आफ्रिकेचा संघ गुणतालिकेत आठव्या स्थानावर आहे. दक्षिण आफ्रिका संघाचे अद्याप तीन सामने बाकी आहेत. त्यांनी सर्व सामन्यात विजय मिळवला तरी त्यांना उपांत्यफेरीत स्थान मिळण्याची शक्यता ढासळली आहे.

द. आफ्रिकेचा संघ स्पर्धेतून बाहेर जरी पडला असला तरी एखाद्या तगड्या संघासाठी डोकेदुखी ठरू शकतो. उर्वरित सामन्यात विजय मिळवून शेवट गोड करण्याचा प्रयत्न ते नक्कीच करतील. अफगाणिस्तान संघाचे उर्वरित सामने पाकिस्तान, श्रीलंका आणि ऑस्ट्रेलियाबरोबर आहेत.

स्पर्धा सुरू झाल्यानंतर वेगवान गोलंदाज डेल स्टेन आणि एन्रिच नॉर्जे, आणि एन्गिडी या प्रमुख गोलंदाजांना झालेल्या दुखापतीमुळे दक्षिण आफ्रिकेला यंदाच्या विश्वचशकात चांगलाच फटका बसला. गोलंदाजीसह क्षेत्ररक्षणातही दक्षिण आफ्रिका फिकी असल्याचे दिसले.