मृत्यूपूर्वी २०११च्या विश्वचषक अंतिम फेरीत महेंद्रसिंह धोनीने मारलेला विजयी षटकार पाहिन आणि मगच समाधानाने डोळे मिटेन. -सुनील गावस्कर

युद्ध प्रत्यक्ष युद्धभूमीवर लढण्यापूर्वी ते मनात सुरू झालेले असते. प्रतिस्पर्धी सैन्यदलावर कशा रीतीने कुरघोडी करायची याचा आराखडा उत्तम सेनापती तयार करतो. मग रणांगणावरही तो परिस्थितीनुरूप रणनीती आखतो. युद्ध जिंकण्यासाठी रणनीतीच महत्त्वाची असते, असे युद्धतज्ज्ञांचे म्हणणे आहे. रणनीती ही बुद्धिबळाच्या चालीसारखी असते. ती जशी युद्धात वापरली जाते, तशीच मैदानावरही. त्यामुळेच महेंद्रसिंह धोनीला रणनीतीकार असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. किंबहुना चपळ यष्टीरक्षक, ‘फिनिशर’ म्हणजेच विजयवीर फलंदाज या साऱ्या भूमिका यशस्वीपणे अदा करणारा धोनी कठीण प्रसंगातील त्याच्या अचूक निर्णयक्षमतेसाठीच विशेष ओळखला जातो.

धोनीची भारताच्या विश्वचषक अभियानात महत्त्वाची भूमिका असेल. त्याच्या दिशादर्शक सल्ल्याने सामन्याचा निकाल बदलू शकतो, यावर आमचा विश्वास आहे, हे भारताचा कर्णधार विराट कोहलीने विश्वचषकाआधीच स्पष्ट केले आहे. क्षेत्ररक्षणाची मांडणी करणे, गोलंदाजांना योग्य सल्ले देणे, अशक्यप्राय एकेरी धाव घेणे, त्वरेने यष्टीचीत करणे, ही कार्ये तो सहजगत्या करतो. त्यामुळेच कोहली मैदानावर आणि मैदानाबाहेरही धोनीवर विसंबून असतो. धोनी जेव्हा धावांसाठी झगडत होता, तेव्हा प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी टीकाकारांनी खडसावून सांगितले होते की, सुनील गावस्कर, कपिल देव, सचिन तेंडुलकर यांच्यासारखे क्रिकेकपटू ३०-४० वर्षांत एखादेच निर्माण होता. धोनीचे भारतीय क्रिकेटमधील स्थान हे त्यांच्याप्रमाणेच असल्याने कुणीही त्याच्यावर टीका करण्यास लायक नाही.

क्लाइव्ह लॉइडने आपल्या कुशल नेतृत्वक्षमतेच्या बळावर वेस्ट इंडिजला दोन विश्वचषक जिंकून दिले. अर्जुन रणतुंगाने संघातील हरहुन्नरी खेळाडूंची मोट बांधून श्रीलंकेला विश्वविजेतेपदापर्यंत नेले. सुरुवातीच्या षटकात क्षेत्ररक्षणाची बंधने असताना सनथ जयसूर्या आणि रोमेश कालुविथर्णाला सलामीला पाठवून गोलंदाजांवर बेछूट हल्ला करण्याची चाल ही रणतुंगाचीच. १९९९च्या विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथने विजयवीराची संकल्पना रूढ केली. सहाव्या क्रमांकावर उतरणाऱ्या मायकेल बेव्हनने हिंमतीने खेळत संघाला अनेकदा विजयरेषेपर्यंत नेले. रणनीतीसंदर्भात धोनीची अशी अनेक उदाहरणे देता येतील.

२००७च्या ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पध्रेच्या पाकिस्तानविरुद्धच्या अंतिम सामन्यात अखेरचे षटक जोगिंदर शर्मासारख्या बेभरवशाच्या गोलंदाजाकडे देऊन विश्वविजेतेपदाचे गणित साकारले. मग २०११च्या एकदिवसीय विश्वचषक स्पध्रेत श्रीलंकेविरुद्धच्या अंतिम सामन्यात डावे-उजवे असा समन्वय मैदानावर राहावा म्हणून युवराज सिंगच्या आधी तो फलंदाजीला उतरला आणि नाबाद ९१ धावांची खेळी उभारली. हे त्याने त्याच्या १५ वर्षांच्या कारकीर्दीत अनेकदा करून दाखवले आहे.

यंदाच्या विश्वचषकाला धोनी अधिक आत्मविश्वासाने सामोरा जात आहे. वर्षांच्या पूर्वार्धातील नऊ सामन्यांत त्याने चार अर्धशतकांसह आणि ८१.८०च्या धावसरासरीने एकूण ३२७ धावा केल्या आहेत. एप्रिल २०१५पासून भारताला धावांचा पाठलाग करून ४३ सामने जिंकायचे होते. यापैकी २८ सामने भारताने जिंकले, तर १४ गमावले. या यशस्वी पाठलागांचा आढावा घेतल्यास धोनीची धावांची सरासरी ५८ आहे, तर पराभवांचा वेध घेतल्यास ती २५.०७ आहे. यातूनच धावांचा पाठलाग करताना धोनी हा घटक किती महत्त्वाचा आहे, हे स्पष्ट होते.

धोनी आता ३७ वर्षांचा आहे. परंतु पंचविशीतल्या खेळाडूप्रमाणेच त्याची तंदुरुस्ती आहे. त्यामुळे देशभरातील नव्हे, परदेशातीलही अनेकांसाठी तो आदर्श आहे. शांत वृत्तीने अवघड प्रश्नांची उकल करणाऱ्या ‘कॅप्टल कुल’च्या पद्धतीकडे व्यवस्थापन शास्त्रही आदराने पाहते. यंदाचा विश्वचषक हा त्याच्या कारकीर्दीतील अखेरचा असेल. त्यामुळे तो स्वत: जसा या विश्वचषकाकडे ‘लक्ष्यपूर्वक’ पाहात आहे. तसेच त्याचे संघसहकारी दोन विश्वचषक जिंकणाऱ्या धोनीला आणखी एका विश्वचषकाची भेट देण्याच्या ईष्रेने खेळत आहेत.

धोनी क्रिकेट कारकीर्दीकडे अत्यंत गांभीर्याने पाहतो. त्याच्याच वाक्यात सांगायचे तर, ‘‘दडपणाविषयी माणसे नकारात्मक पद्धतीने विचार करतात. माझ्यासाठी दडपण म्हणजे अतिरिक्त जबाबदारी असते. मी तरी याच पद्धतीने त्याकडे पाहतो. जेव्हा देव तुम्हाला तुमच्या देशासाठी किंवा संघासाठी नायक होण्याची संधी देतो, तेव्हा तुम्ही त्याला दडपण कसे म्हणाल!’’