भारतीय क्रिकेट संघ म्हणजे निळ्या रंगाच्या जर्सीमध्ये मैदानात उतरणार हे समीकरण आपल्या सर्वांच्या मनात पक्कं झालं आहे. मात्र इंग्लंडविरुद्ध सामन्यात भारतीय संघ नवीन जर्सीमध्ये मैदानात उतरणार आहे. रविवारी भारत आणि इंग्लंड यांच्यात सामना होणार आहे, या सामन्याकरता भारतीय संघ भगव्या रंगाची जर्सी घालून मैदानात उतरणार आहे. ANI या वृत्तसंस्थेने यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे.

२०१९ विश्वचषक स्पर्धेसाठी आयसीसीने Home आणि Away ही संकल्पना राबवली आहे. दोन्ही सामन्यांसाठी प्रत्येक संघ वेगळी जर्सी घालून मैदानात उतरणार आहे. “Away सामन्याकरता बीसीसीआयला वेगळ्या रंगाचे पर्याय दिले होते. इंग्लंडचा संघ देखील निळ्या रंगाची जर्सी घालून मैदानात उतरणार असल्यामुळे दोन्ही संघ एकसारखेच दिसणार नाहीत याची आम्हाला काळजी घ्यायची होती.” आयसीसीमधली सुत्रांनी ANI ला माहिती दिली.

अवश्य वाचा – World Cup 2019 : केदार जाधव चौथ्या क्रमांकासाठी योग्य पर्याय !

भारताच्या टी-२० जर्सीमध्ये भगव्या रंगाची छटा आहे. यावरुन नवीन जर्सीची संकल्पना घेतल्याचं आयसीसीच्या सुत्रांनी सांगितलं. अफगाणिस्तानच्या रंगाची जर्सीमध्येही निळ्या रंगाचा समावेश असल्यामुळे त्यांच्यासाठी लाल रंगाची छटा असलेली जर्सी तयार करण्यात आली होती. आतापर्यंत भारतीय संघ विश्वचषक स्पर्धेत अजिंक्य राहिलेला आहे. गुरुवारी भारतासमोर वेस्ट इंडिज तर रविवारी इंग्लंडचं आव्हान असणार आहे.

अवश्य वाचा – World Cup 2019 : या धोनीचं करायचं काय? टीम इंडियाच्या मॅनेजमेंटसमोर गहन प्रश्न