भारताचा सलामीवीर शिखर धवन याला दुखापतीमुळे विश्वचषक स्पर्धेतून माघार घ्यावी लागली. सलामीवीर शिखर धवन अंगठ्याला झालेल्या दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर गेला. पीटीआय वृत्तसंस्थेने या संदर्भातील वृत्त दिले. तसेच भारतीय संघाचे व्यवस्थापक सुनील सुब्रमण्यम यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला. पण याच दरम्यान अशा पद्धतीच्या दुखापतीने खापर टीम इंडियाच्या ट्रेनरने IPL वर फोडले आहे.

टीम इंडियाचे ट्रेनर शंकर बसू पत्रकार परिषदेत म्हणाले की खेळाडूंना आपल्या झोपेच्या वेळा, योग्य काळाची झोप, सकस आहार आणि तंदुरुस्ती याची जाणीव असते. पण IPL स्पर्धेदरम्यान खेळाडू मध्यरात्री २ किंवा ३ वाजता झोपतात. त्यानंतर सकाळी पुन्हा वेळेत सराव सत्रात हजर रहाणे हे अत्यंत कठीण असते.

भुवनेश्वर कुमारच्या तंदुरुस्तीबाबत तूर्तास काहीही बोलणे त्यांनी टाळले.

दरम्यान, शिखर धवन अंगठयाच्या दुखापतीमुळे वर्ल्डकपला मुकण्याची शक्यता ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यानंतरच व्यक्त करण्यात आली होती. त्याच्या अंगठ्याला झालेल्या दुखापतीमुळे त्याला तीन आठवडे विश्रांतीचा सल्ला देण्यात आला होता. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात धवनने दमदार शतक ठोकले होते, पण दुखापतीमुळे ऑस्ट्रेलियाच्या डावात तो क्षेत्ररक्षणासाठी मैदानात उतरला नव्हता. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्याला किमान तीन आठवडे विश्रांतीचा सल्ला देण्यात आल्याची माहिती देण्यात आली. त्यामुळे डावखुऱ्या धवनची दुखापत ऋषभ पंतला संघात स्थान देण्यास कारणीभूत ठरले असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता.

टीम इंडियाचे व्यवस्थापक सुनील सुब्रमण्यम यांनी दिलेल्या माहितीनुसार धवनच्या डाव्या अंगठ्याला दुखापत झाली असून बोटाला फ्रॅक्चर आहे. जुलैच्या मध्यापर्यंत त्याची दुखापत पूर्णपणे बरी होणे शक्य नाही. त्यामुळे विश्वचषक स्पर्धेतील उर्वरित सामन्यातून त्याला माघार घ्यावी लागली आहे. जायबंदी शिखर धवनच्या जागी ऋषभ पंतला बदली खेळाडू म्हणून अंतिम १५ खेळाडूंच्या संघात स्थान मिळावे अशी विनंती आम्ही केली आहे.

शिखरची तपासणी केल्यानंतर, १०-१२ दिवसात तो बरा होईल, असं संघाचे फिजीओ आणि डॉक्टरांच्या टिमने सांगितलं होतं. यासाठी पर्यायी खेळाडू म्हणून ऋषभ पंतला इंग्लंडला रवाना करण्यात आलं होते. मात्र शिखर धवनच्या दुखापतीमध्ये सुधार होणार नसल्याचे समजताच त्याचे स्पर्धेबाहेर जाणे निश्चीत करण्यात आले. आता शिखर धवनच्या जागी ऋषभ पंतला संघात जागा देण्यात आली आहे.