भारतीय संघ इंग्लंडमध्ये होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेसाठी मंगळवारी रात्री रवाना झाला. या संघात अनेक अनुभवी खेळाडू आहेत. मात्र त्यापैकीही टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि वेगवान गोलंदाजीच्या चमूचे नेतृत्व करणारा जसप्रीत बुमराह हे दोघे यंदाच्या विश्वचषक स्पर्धेत विशेष चमक दाखवतील, असे मत इंग्लंडचा माजी कर्णधार नासिर हुसेन याने व्यक्त केले. ३० मे पासून विश्वचषक स्पर्धेच्या सामन्यांना सुरुवात होणार आहे. भारताचा पहिला सामना ५ जूनला दक्षिण आफ्रिकेशी होणार आहे.

हे वाचा – World Cup 2019 : “विराट, बुमराह भारताला विश्वचषक जिंकवून देतील”

“टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली, न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन, विंडीजचा सलामीवीर ख्रिस गेल, अष्टपैलू खेळाडू आंद्रे रसल, अफगाणिस्तानचा फिरकीपटू रशीद खान आणि टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह हे खेळाडू यंदाच्या विश्वचषक स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करून दाखवतील. क्रिकेट जगतातील सर्वात उत्कृष्ट आणि सर्वोत्तम खेळाडू म्हणजे विराट कोहली. तो इंग्लंडमध्ये क्रिकेट विश्वचषक खेळण्यासाठी येणार ही येथील क्रिकेटरसिकांना पर्वणीच असणार आहे. तसेच यंदाच्या विश्वचषकात प्रतिभावान गोलंदाजांपैकी एक म्हणजे जसप्रीत बुमराह. त्याचा यॉर्करचा मारा आणि डावाच्या शेवटच्या टप्प्यातील गोलंदाजीचा मारा अत्यंत भेदक असतो. संपूर्ण स्पर्धेत त्याचा गोलंदाजीचा स्तर एकसारखाच असतो. स्पर्धेच्या सुरुवातीपासून ते शेवटच्या चेंडूपर्यंत बुमराहची गोलंदाजी अत्यंत भेदक असते. त्यामुळे हे दोघे या स्पर्धेत नक्कीच चमक दाखवतील”, असे हुसेन म्हणाला.

हे वाचा – Cricket Awards : विराट, बुमराह सर्वोत्तम! पहा पुरस्कारांची संपूर्ण यादी

याशिवाय इतर खेळाडूंबद्दलही हुसेनने आपले मत व्यक्त केले. “गेल स्पर्धेत काहीतरी काहस करून दाखवणायच्या उद्देशाने खेळ करेल असे मला वाटते. आंद्रे रसल विंडीजच्या संघातून काही काळ बाहेर होता, पण तो प्रतिभावंत खेळाडू आहे. रशीद खान हा देखील एकदिवसीय क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करण्याची क्षमता राखतो. केन विल्यमसन कायम हसतमुख असतो. त्याची प्रतिभा निराळीच आहे. तो प्रत्येक स्पर्धेत धावा करतो”, असे हुसेनने नमूद केले.